जामखेड । नगर सहयाद्री:-
खर्डा (ता. जामखेड) परिसरात दरोडा टाकणारी आतंरजिल्हा टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून तब्बल ९ लाख २५ हजार रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सागर गोरक्ष मांजरे (रा. अहिल्यानगर), वाहिद काहीद खान ( रा. आंबावली, ठाणे), सिराज मियाज अहमद ( रा. आंबवली,ठाणे ) याच्यासह एक विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
खर्डा येथील सोलर कंपनीमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण करत ६ लाख ७५ हजार रुपयांची कॉपर केबल लंपास केल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड घटनेचा तपास करत होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांना सदरचा गुन्हा केलेले आरोपी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने बीड रोडने जामखेडच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली. आरोपी सागर मांजरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे २८ गुन्हे दाखल आहेत.