spot_img
ब्रेकिंगभाजपच्या ‘सत्ता जिहाद’वर ठाकरेंचा हल्लाबोल; शिंदे-पवारांचाही घेतला समाचार..., नेमकं काय पहा

भाजपच्या ‘सत्ता जिहाद’वर ठाकरेंचा हल्लाबोल; शिंदे-पवारांचाही घेतला समाचार…, नेमकं काय पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
अर्ध शतकाहून अधिक काळ सुरू असलेला ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ आजही तितक्याच दिमाखात आणि दणक्यात साजरा झाला. आजचा दसरा मेळावा विराट अति विराट तर होताच पण एका वेगळ्या अर्थानं ऐतिहासिक ठरला आहे. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रथमच शिवतीर्थावर भाषण केलं. अभूतपूर्व अशा दसरा मेळाव्यात गर्दीचे आजवरचे सारे विक्रम मोडीत निघाले. तर हा मेळावा म्हणजे निष्ठावंतांच अतिविराट मेळावा ठरला. या तुफान गर्दीच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांवर जबरदस्त हल्ला चढवला. देशात फक्त आपलाच पक्ष बाकी कोणताही पक्ष नको असा विचार राबवणाऱ्या भाजपच्या कोणीही चालेल पण सत्ता पाहिजे या प्रकाराला ‘सत्ता जिहाद’ असं म्हणत अक्षरश: सालटी काढली. उद्धव ठाकरे यांच्या तडाखेबंद भाषणाला समोर उपस्थित असलेल्या जनसागराकडून तितकाच तुफान प्रतिसाद मिळत होता. शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाच्या शेवटी शिवसैनिकांनी त्यांच्या मागून प्रतिज्ञा करत महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याच निर्धार केला…

शस्त्रपूजन व सरस्वती पूजन करत असतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्र असतात. कुणाकडे तलवार, बंदूक, मशीनगन असते पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे ठाकरे कुटुंबाने आजही शस्त्त्रपूजा केली पण त्यात शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची पूजा पहिली केली. आता तुमची पूजा करतोय कारण तुम्ही पण माझे शस्त्र आहात. ही लढाई साधीसुधी नाही. एकाबाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा. तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावच्या गावं नेस्तनाबूत केली जायची. तसाच यांनी एक मनसुबा आखला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनाला नेस्तनाबूत करण्याचा. पण यांना कल्पाना नाही की ही नुसती शिवसेना नाही तर ही बाळासाहेबांनी मला दिलेली वाघनखं आहेत. जर तुमचं पाठबळ मला नसतं तर मी उभाच राहू शकलो नसतो. सगळं काही ओरबाडल्या नंतरही तुम्ही आई जगदंबेसारखं माझ्या पाठिशी उभे राहिलात. त्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाही. त्यांना गाडून त्यांच्या उरावर भगवा फडकवून दाखवेन. आपण मजल दरमजल करत चाललो आहोत. दरवर्षी शिवसेनेला भगवे अंकूर फुटतायत. आज जे भगवे आहेत. या भगव्यांच्या मशाली झालेल्या आहेत. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेनाप्रमुखांची बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही., असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

”उद्योगपती गेल्यावर हळहळ वाटणं दुर्मिळ झालंय, कारण टाटांसारखे उद्योगपती विरळे असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या. रोजच्या जेवणातली लज्जत वाढवणारं मिठ दिलं. आताचे उद्योगपती अख्खं मिठागर गिळत आहे. टाटा गेल्याचं वाईट वाटतंयच पण मिठागरं गिळणारे का जात नाही याचंही वाईट वाटतंय. जे जायला पाहिजे ते जात नाही. नको ते जात आहेत. शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर टाटासाहेब घरी आलेले आमची भेट घ्यायला. बराच वेळ बसले. निघताना म्हणाले की तुला आणि मला खूप मोठी परंपरा असलेला वारसा लाभलेला आहे. तुला शिवसेनाप्रमुखांचा तसा मला जेआरडी टाटांचा लाभलेला आहे. मी कामकाजाला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात यायचं की आज जेआरडी असते तर काय केलं असतं. त्यामुळे मी काम करूच शकत नव्हतो. तेव्हा माझ्या मनात आलं की जेआरडीनी माझी शैली बघितली, माझं काम बघितलं तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली. तसंच तुझं आहे शिवसेनाप्रमुखांनी तुला बघितलं आहे. जेव्हा त्यांना खात्री पटली की तुच त्यांचा वारसा समर्थपणे नेऊ शकशील तेव्हाच त्यांनी तुझी निवड केली. त्यामुळे तुला जे योग्य वाटेल तेच तु कर. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी बुसरटलेलं हिंदुत्व आहे. त्यामुळे मी त्यांना लाथ घातली. जा मिंध्यांना सांगा की त्यांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार नाही. सध्या त्यांनी एक जाहिरात केली आहे. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण. पण पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण… अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे. मी देखील श्वान प्रेमी आहे. पण लांडगा प्रेमी नाही. लांडग्यांवर प्रेम करण्याएवढं औदार्य माझं नाही. हे लांडगे वाघाचं कातडं घालण्याचा प्रयत्न करतायत. काय काय उघडं पडतंय ते त्यांना माहित नाही, असा जोरदार टोला त्यांनी मिंध्यांना लगावला.

”हे महाभारत आहे. जसे कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. कौरव शंभर होते आणि पांडव पाच होते. पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला सुईच्या अग्रावर मावेल एवढी देखील जमीन देणार नाही. तिच वृत्ती भाजपची आहे. या देशात कोणताही पक्ष शिल्लक राहिला नाही पाहिजे. फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमिन मावली नाही तरी चालेले. पण तिच सुई तुम्हाला कुठे टोचेल ते तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली. तुम्ही त्यांना संपवायला निघालात. खरंतर हे पाप आमचं आहे जेव्हा यांना महाराष्ट्रात जेव्हा यांना कुणी विचारत नव्हतं. तेव्हा यांना महाराष्ट्रात खांद्यावर घेऊन फिरवलं. आज देखील आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणात खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावी लागेल. महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की महाभरतात अर्जुनाला वाटत होतं की मी कुणाशी लढू. ज्यांना मी माझं मानलं तिच माणसं माझ्यावर वार करायला येतायत. कसं लढू त्यांच्यासोबत. तेव्हा कृष्णाला अर्जुनाला समजवायला लागलं. माझे आजोब सांगायचे की कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. महाभारतात अर्जुनाला वाटत होतं की मी कुणाशी लढू. ज्यांना मी माझं मानलं तिच नालायक माणसं माझ्यावर वार करायला येतायत. कसं लढू त्यांच्यासोबत. तेव्हा कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली. कृष्णाने गीता सांगितली ती अर्जुनाला पण अमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या अंगावर देखील आप्तस्वकीयच आले होते. महाराजांनी बघितलं नाही की हा कोण आहे. जो स्वराज्यावर चालून येतो तो माझा शत्रू. त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोकं आहे. ती आपल्या अंगावर येतायत त्यांचा राजकारणातला शिरच्छेद करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना मोदी भाजपला मतं मिळवणारं मशीन वाटतं. पण ते मशीन नाही आमचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराज्यावर चालून आले त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो. प्रभू श्री रामचंद्रांनी जसे दैत्य राक्षस मारले. तसे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दैत्य, राक्षसच मारले. भाजप केवळ मतांसाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारते. नालायकांनो तुम्ही पुतळ्यात पण पैसे खाता. आपलं सरकार आल्यानंतर मी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. ते आमचे दैवत आहे. होय आम्ही आमच्या दैवताना देवाऱ्ह्यात ठेवतो त्यांना पूजतो. जसं आम्ही जय श्री राम म्हणतो तसं आम्ही त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात सर्वात प्रथम आरमार उभं केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही ईव्हीएम मशीनसारखा वापर करू नका. आम्ही आमच्या महाराजांना दैवत मानतो. आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कुणी पुजायचं? असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पहिलं आईला वाचवा मग गाईला वाचवा हे आमचं हिंदुत्व आहे.

”संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. मला भागवतांबद्दल आणि संघाच्या लोकांबद्दल आदर आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगता ते कुणासाठी सांगताय. परवा भागवत म्हणाले की हिंदूनो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या. दहा वर्ष झाली विश्वगुरु तिथे बसले आहेत. अजुनही तुम्ही हिंदूचं रक्षण करू नाही शकत. त्या राजू श्रीवास्तवचा एक जोक आहे. पूर्वी गुरखे असायचे राखण करायचे जागते रहो जागते रहो और मेरे भरोसे पर मत रहो. मग तसं सांगा की आम्ही नालायक आहोत आम्ही तुमचं रक्षण करू शकत नाही. रक्षण नाही करू शकत तर कशाला हवे मोदी. दहा वर्ष संपूर्ण देशांनी तिसऱ्यांदा सत्ता देऊनही जर तुम्ही म्हणत असाल की या देशातला हिंदू खतरऱ्यात आहे. तर मी म्हणेन काँग्रेस बरी होती कारण तेव्हा तुम्ही म्हणायचात की इस्लाम खतरे में हैं. भागवतांनी आज सांगितलं की जगात जिथ जिथली सरकारं पाडली जातायत तिथला अल्पसंख्याक खतऱ्यात येतोय. मला ज्या प्रकारे गद्दारी करून खाली खेचलं ते तुम्हाला दिसलं नाही का? ज्या शिवसेनाप्रमुखांनी साथ सोबत दिली त्यांच्या पुत्राला तुम्ही खाली खेचलं. तुमचे शकुनी मामा गद्दारांना घेऊन राज्य करतायत. पूर्वीचा अटलजींचा भाजप होता तो वेगळा होता, भगव्याला मानणारा होता. त्यात एक पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झालेला आहे. सगळे भ्रष्टाचारी नेते या भाजपमध्ये घुसले आहेत. तो भाजप आता आमच्यावर राज्य करणार. भारतीय जनता पक्ष लाज वाटली पाहिजे तुम्हाला भारतीय म्हणताना. जनतेचा पक्ष तर तुम्ही राहिलेला नाही. सगळे चित्र विचित्र भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही आमच्यावर राज्य करतायत. गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतंय त्यातच तुमचा पराभव आहे. चोरांना डोक्यावर बसवताय. कि्ती खाताय,. किती भ्रष्टाचार करताय. हिंदुत्व नक्की काय आहे. गाईला राज्यमाता दर्जा दिला. देशी गाय प्राणी म्हणून वाचवली पाहिजेच. गाय ही राज्यमाता, मराठी अभिजात भाषा. मग राज्याची राज्यभाषा कोणती. गाईचा हंबरडा ही राज्यभाषा होणार का. जर गाईचा हंबरडा ही राज्य भाषा होणार असेल तर कोवळ्या कोवळ्या मुलींवर जे अत्याचार होतात तो हंबरडा तुमच्या कानापर्यंत का जात नाही? पहिलं आईला वाचवा मग गाईला वाचवा हे आमचं हिंदुत्व आहे. महाराई रोखू शकत नाही तर गायीच्या मागे लपता. तुमचा हा भाकड पणा आम्हाला मान्य ना्हीा. मध्येच कुठून हे गोरक्षक उपटतात. हरयाणात एका 22 वर्षाच्या मुलाचा गोळ्या घालून खून केला. तथाकथित गो रक्षकांनी त्याला गोळ्या घालून मारला. गोमांसाची तस्करी करत होता. कुठेच बातमी नाही आली कारण तो आर्यन मिश्रा होता. तोच जर आर्यन खान असता तर आगडोंब उसळला असता. जर गोमांसाची तस्करी केली म्हणून आर्यन मिश्राला मारलं तर किरेन रिजीजू म्हणाले की मी गोमांस खातो काय उखडायचे ते उखडा म्हणतात. त्या रिजीजूंच्या मांडिला मांडी लावून तुम्ही बसता. म्हणून मी म्हणतो की मला हे भाजपचे बेगडी हिंदुत्व मान्य नाही. या बेगडी हिंदुत्ववाद्यांशी मी लढतोय. यांनी हिंदू मुसलमान असा झगडा लावलेलाच आहे. हिंदूमध्ये जातीपातीमध्ये भांडण लावतायत. मराठी माणसांमध्ये आरक्षणावरून भांडणं लावतायत. तुमच्यात धमक असेल तर सर्वांना आरक्षण द्यायला हवं होतं. वाजपेयींनी सोलापूरमध्ये जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आऱक्षण देईन. वाजपेयी जाऊन इतकी वर्ष झाली पण आरक्षणचा वाद संपलेला नाही. का तुम्ही हे पाप करत आहात. का जातीपातीमध्ये भांडणं लावता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. तसंच अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. अजित पवार हे २०१९ ला जे महाविकास आघाडी सरकार आलं त्यातही उपमुख्यमंत्री होते आणि त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्येही ते जुलै २०२३ पासून उपमुख्यमंत्री आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत जो काही पराभव महायुतीचा झाला त्यानंतर अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चा आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख करत अजित पवार बाहेर पडण्याचा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे भाषणात काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राची ओळख सांगणारी ही लढाई आहे. महाराष्ट्राचं जे वर्णन आहे. मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कोमल देशा, फुलांच्या देशा… दळभद्र्यांच्या देशा नाही. बुद्धीच्या देशा. हे वर्णन कायम ठेवायचं आहे. लाचार आणि गद्दारांच्या देशा असं करायचं नाही. मी काही झालं तरी हा महाराष्ट्र भाजपच्या हाती जाऊ देणार नाही. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मोदी शाह यांच्या हाती जाऊ देणार नाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे अजित पवार महायुतीत राहणार नाहीत या आशयाचं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, आता असं कळलंय की ७० हजार कोटींचा घोटाळा करणारेही लाजून बाहेर पडणार आहेत. त्यांना पण लाज वाटू लागली आहे. असं ऐकलंय. यांचा घोटाळा मोठा आहे. माझा तर काहीच नाही असं त्यांना वाटतंय. असं मी ऐकलंय. अशी बातमी आहे. सगळं त्यांना लखलाभ असो जीवात जीव असे पर्यंत महाराष्ट्र लुटू देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी-शाह यांचा होऊ देणार नाही. शाहू, फुले आंबेडकरांचा आणि छत्रपतींचा महाराष्ट्र मोदींच्या हाती जाऊ देणार नाही अशीही गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...