मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असलेले ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक जण आमच्या संपर्कात असून टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
उदय सामंत यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ऑपरेशन टायगरबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, मअनेक जण संपर्कात असून टप्प्या टप्प्याने प्रवेश होणार हे निश्चित आहे. अनेक मंत्री आणि नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. येत्या 90 दिवसांत मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. येत्या 3 महिन्यात अनेक माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक लोकं आमच्या संपर्कात आहेत.
तसंच, शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखाली चालते. शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जण आजही संपर्कात आहेत. शिंदेंच्या राजकीय प्रवासात त्रास होईल असे कृत्य नाही. मी मर्यादा ओळखून राजकारण करतो. मिशन राबवताना कोणी सांगून राबत नाही. 90 दिवसांत 10 ते 12 जण प्रवेश करणार आहेत. असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार आहे.
आम्ही ठाकरेंसोबतच; खासदार
दरम्यान, एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत, असं सामंत यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वच्या सर्व खासदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत. आम्ही कोणत्याही वेगळ्या पक्षात जाणार नाही, अशी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.