अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय पदाधिकार्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकार्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी शहरातील काही निवडक पदाधिकार्यांशी शहरातील इच्छुक उमेदवारांबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली.
यात, शहरातून जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व माजी आमदार स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड यांची नावे सुचवण्यात आल्याची माहिती समोर आली. शासकीय विश्रागृहावर आयोजित बैठकीस जिल्हाप्रमुख गाडे, रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, शहरप्रमुख संभाजी कदम, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार सावंत यांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील संघटनेतील पदाधिकारी, विभाग व शाखा प्रमुख, बूथ प्रमुख आदींच्या संपर्क क्रमांकासह याद्या पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शहरातील काही पदाधिकार्यांनी उमेदवारीबाबत स्वतंत्रपणे त्यांच्याशी चर्चा केली.
शहरातून माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून शशिकला राठोड यांचेही नाव चर्चेत आले आहे. काल काही पदाधिकार्यांनी खासदार सावंत यांची भेट घेऊन शशिकला राठोड किंवा शशिकांत गाडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली असल्याचे सांगण्यात आले.