मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून 29 जून रोजी करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.5) वरळीतील डोममध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रभरातून जनसागर लोटला होता. या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी दोघांनीही एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब केले.
एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्मानिय राज ठाकरे असा उल्लेख करत मी माझ्या भाषणाची सुरवात करतो असे म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरवात केली. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाच आहे. आमच्या दोघांतील मअंतरपाटफ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी असे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या एकत्रीकरणाचे सूतोवाच केले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
ते म्हणाले होते, एक निशाण एक झेंडा. हिंदी सक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे यांनी निर्णय आणला म्हणतात. मी एवढं काम करत होतो तर सरकार कशाला पाडलं? महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला, असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? तुम्ही आमच्यात गद्दारी करवली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही हे करत आहात, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. गद्दार म्हणत त्यांनी केलेल्या मजय गुजरातफ या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा : राज ठाकरे
सरकारला फक्त मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. हाच मराठीचा दबदबा आहे. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी दिला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या सर्व तमाम मराठी भगिनींनो बांधवांनो मातांनो..अशी केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असेही ते म्हणाले, पुढे त्यांनी सांगितलं की, दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून घ्या, ऐकून घ्या, दादा तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. कुठून त्रिभाषा सूत्र आणलं, त्रिभाषा सूत्र आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी.
सुप्रीम कोर्टात इंग्रजीचा वापर होतो, कुठं आहे भाषा सूत्र, नव्या शिक्षण धोरणात नाही, इतर कुठल्याही राज्यात नाही, दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत असे म्हणत त्यांनी टीका केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. या संपूर्ण हिंद प्रांतावर 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. या प्रदेशांवर राज्य केलं, आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्यप्रदेश, पंजाबवर, अटकपर्यंत मराठी साम्राज्य पोहोचलेलं आम्ही मराठी लादली? का असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात हिंदी सक्ती का असा सवाल केला.