नगर । नगर सहयाद्री:-
नगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात एक भीषण अपघात घडला. मालवाहू टेम्पोने दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून नगरकडे येणारा मालवाहू टेम्पोने (क्र. एमएच १२ व्हीएफ ८६४९) चास गावाच्या उतारावर नगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कार (क्र. एमएच १४ एफजी ९९२८) ला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या अपघातात कारचालक इनूस मोईनउद्दीन शेख (वय अंदाजे ३०, रा. शिरूर, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हात, डोळे व शरीराच्या इतर भागांमध्ये काचा घुसल्यामुळे तसेच डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जगदीश जंबे यांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली व वाहतूक सुरळीत केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.