अहिल्यानगर। नगर सहयाद्री
शहरातील तारकपूर परिसरात शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात वृद्ध महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेखा गुरुलिंग होनराव (वय 71, डावरे गल्ली, अहिल्यानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
सुरेखा होनराव या त्यांच्या मुलासह वैद्यकीय कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तेथून काल (ता. 4) रात्री 11.30 वाजेच्या सुमारास त्या त्यांच्या मुलासह दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकनेदुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी चालवत असलेला सुरेखा होनराव यांचा मुलगा एका बाजूला पडला.
ते जखमी झाले. तर सुरेखा होनराव या ट्रकच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तारकपूर परिसरातील झुलेलाल मंदिराजवळ घडली. मागील दोन दिवसांत ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याची ही अहिल्यानगर शहरातील दुसरी घटना आहे. सुरेखा होनराव यांच्या पश्चात पती, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.