मुंबई | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाबाबत बराच काळ सस्पेंस होता. यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी झाली. मात्र आता सर्व ठीक आहे असे वाटत असतानाच राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये खडाजंगी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन बड्या पक्षांनी एकत्र येऊन विधानसभेत मोठे यश मिळवले. या विजयानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी 16 दिवस लागले. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना सावध पवित्रा घ्यावा लागला. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी दिसून आली. आता ते प्रकरण शांत झाले असले तरी पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्रिपदानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाला आहे. यावरून काही जिल्ह्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे, कोकण – सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, मराठवाडा – संभाजीनगर, बीड
उत्तर महाराष्ट्र – नाशिक, ठाणे शहर आणि नवी मुंबई, कोल्हापूर मध्ये पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.