मुंबई / नगर सह्याद्री :
लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेत. या बदलामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार आहे. कारण लाखो महिला या योजनेत अपात्र ठरणार आहेत. ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसेल किंवा त्यांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय.
योजना सुरू राहील
सोमवारी विधानसभेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असल्याची चिंता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात होती. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोझा पडत असल्याने ही योजना बंद होईल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. विरोधकांना चिंता करण्याचं काम नाही. सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी राज्यातील महिलांना आश्वस्त केले.
निकषात बदल होणार
अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. मात्र, त्या योजनेच्या निकषात बदल केले जातील. ज्या लाभार्थी महिलांची आर्थिक स्थिती हलाकीची असेल. ज्या महिलांचे उत्पन्न कमी असेल, अशाच महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ही योजना घाईघाईत सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुती सरकारने योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या हप्त्यात वाढ केली जाणार, असल्याची घोषणा केली होती.
अपात्र अर्जावर होणार कारवाई
महायुती सरकार परत सत्तेत आले तर महिलांना दिले जाणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असं आश्वासन नेत्यांनी प्रचारावेळी दिलं होतं. लाडकी बहीण योजनेच्या लाभर्थी महिलेला सरकार १५०० रुपयांची आर्थिक मदत करते. यात वाढ करत महिलांना २१०० रुपयांचा हप्ता दिला जाईल, असं महायुतीकडून सांगण्यात आलं होतं.
महायुती सत्तेत आल्यानंतरही याबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाहीये. याच दरम्यान या योजनेचा आढावा घेऊन अपात्रांना वगळण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र,अजित पवार यांनी अपात्रांनाही काहीसा दिलासा दिलाय. जे अपात्र ठरतील त्या महिलांकडून सरकार पैसा परत घेणार नसल्याचंही अजित पवार म्हणालेत.