मनपाकडून तपासणी | दुबार नाव असल्यास कोणत्या केंद्रावर मतदान करणार याबाबत अर्ज घेणार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये किती मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आलेली आहेत, याची यादी उपलब्ध झाली आहे. मतदार यादीमध्ये संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (*) असे चिन्ह दिलेले आहे. या यादीतील संभाव्य दुबार मतदारांबाबत तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत खात्री केली जाणार आहे. मतदाराचे नाव, लिंग, पत्ता व छायाचित्र याची प्राथमिक तपासणी करून त्यांत साम्य आढळून आल्यास संबंधित मतदाराशी संपर्क साधून त्याच्याकडून आवश्यक माहिती घेतली जाईल अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
एकापेक्षा जास्त नाव असलेला मतदार हा प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहे, याची खात्री झाल्यानंतर त्या मतदाराकडून तो नेमका कोणत्या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबतचा अर्ज घेण्यात येईल. तपासणी अधिकार्याची खात्री पटल्यानंतर संबंधित मतदारास त्याच्या इच्छेप्रमाणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्र निश्चित केले जाईल. संबंधित मतदारांस त्याने निवडलेल्या प्रभागातील मतदान केंद्रातच मतदान करण्याचा अधिकार असेल. इतर प्रभागातही नाव असलेल्या अशा मतदाराच्या नावासमोर दुबार मतदार, प्रभाग क्रमांक, मतदार क्रमांकची नोंद करून संबंधित मतदार ज्या प्रभागात मतदान करणार आहे, त्याचा क्रमांक व मतदाराचा अनुक्रमांक नमूद केला जाईल. अशी नोंद झालेल्या मतदारास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.
जर एकापेक्षा अधिक नावे असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास मतदार यादीमध्ये अशा मतदाराच्या नावासमोर दुबार मतदार अशी नोंद घेण्यात येईल. अशी नोंद असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदान करण्यास आल्यास त्या मतदाराकडून त्याचे नाव असलेल्या इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येईल व अशा मतदाराची काटेकोरपणे ओळख पटवून त्यास मतदान करू देण्याची मुभा दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.



