अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अभ्यास केला नाही म्हणून क्लास चालक शिक्षकाने एका अल्पवयीन मुलास मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बुधवारी (11 डिसेंबर) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील श्रीराम चौकातील झा क्लासमध्ये घडला. याबाबत कमलाकांत झा (रा. श्रीराम चौक, अहिल्यानगर) याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (12 डिसेंबर) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुकुंदनगर येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांचा मुलगा सावेडी उपनगरातील झा क्लसेसमध्ये जात होता. तो बुधवारी नेहमीप्रमाणे क्लासला गेला होता. त्यावेळी अभ्यास का केला नाही, अशी विचारणा करत कमलाकांत झा यांनी तक्रारदार यांच्या मुलाला चापटीने मारहाण केली. त्याने क्लासमध्ये शिक्षकांनी मारहाण केल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी कमलाकांत झा यांना फोनवरून याबाबत विचारणा केली. त्याचा कमलाकांत यांना राग आला.
त्यांनी उलट पालकांनाच उर्मट भाषा वापरली. त्यामुळे तक्रारदार यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी क्लासला भेट दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक यू. एन. रजपूत करीत आहेत.