अहिल्यानगर । नगर सहयाद्री
केडगाव येथील भुषणनगरमधील आनंद राव हाऊसिंग सोसायटीतून १५ लाख रुपये किमतीची टाटा हॅरीयर (एम.एच १६ सी. वाय.१५१५) गाडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गाडीचे मालक शुभम दिपक जगताप (वय २८, रा. महावरी कॉलनी, सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम जगताप हे मोबाईल शॉप चालवत असून त्यांनी २०२२ मध्ये सदर टाटा हॅरीयर गाडी खरेदी केली होती. ही गाडी त्यांचे चालक श्रीनिवास गिरीश धाडगे (रा. भुषणनगर, केडगाव) यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये लावली होती
अज्ञात चोरट्यांनी २१ ऑगस्ट रोजी ड्रायव्हर साईडच्या मागील काचेची तोडफोड करत गाडी लंपास केली. त्यानंतर त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला. परंतु गाडी कुठेही सापडली नसल्याने कोतवाली पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.