अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रूईछत्तीसी (ता. नगर) येथील साई लॉजिंगवर वेश्याव्यवसाय चालवल्याच्या आरोपावरून छापा टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांनी एकाला अटक केली असून, तिघे पसार झाले आहेत. 11 महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करून अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भैय्या उर्फ गणेश संपत गोरे आणि त्याचा साथीदार मनोज गावडे हे साई लॉजिंगमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे स्पष्ट झाले.
तपास पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (12 फेब्रुवारी) पहाटे छापा टाकण्यात आला. छाप्या दरम्यान शंभू उर्फ शुभम अशोक पाळंदे (वय 29, रा. मुलणमाथा, ता. राहुरी) याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख असा एकूण 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
साई लॉजिंगमध्ये 11 महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांनी भैय्या गोरे, मनोज गावडे यांनी राणा (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मुंबई) याच्याकडून वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने आणल्याचे सांगितले. महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या फिर्यादीवरून भैय्या उर्फ गणेश संपत गोरे (रा. रूईछत्तीशी), मनोज आसाराम गावडे (रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), शुभम अशोक पाळंदे (रा. मुलनमाथा, ता. राहुरी) व राणा (पूर्ण नाव माहिती नाही, मुंबई) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक इंगळे, उपनिरीक्षक धाकराव, अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.