Maharashtra Crime News: एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या आत्महत्येमागे पत्नीकडून होणारा कथित आर्थिक आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आणि स्टेटसमध्ये नमूद केले आहे.
शिलानंद तेलगोटे यांनी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा एमआयडीसी परिसरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवले होते, ज्यात त्यांनी पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्येही पत्नीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैशांची गरज होती. त्यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढले होते. मात्र, कर्जाचे हप्ते फेडण्यास पत्नीच्या भावाने नंतर नकार दिला. त्यामुळे या कर्जाचे हप्ते व्याजासह भरण्याचा बोजा शिलानंद यांच्यावर आला होता. या आर्थिक ताणाबरोबरच पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्नी अश्लील शिवीगाळ करत असल्याचे आणि गेल्या पाच दिवसांपासून आपण जेवणही केले नसल्याचे त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, “माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल, पण माझ्या पत्नीला माझा चेहरा दाखवू नका.” पती-पत्नीच्या नात्यात इतकी कटुता कशी येऊ शकते, हा प्रश्न यातून निर्माण होतो. याशिवाय, त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच आपले मृत्युपत्र लिहून ठेवल्याचे आणि आपली संपूर्ण संपत्तीआपल्या मुलाच्या नावावर केल्याचेही स्टेटसमध्ये नमूद केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे तेलगोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, सुसाईड नोट आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.