पुणे। नगर सहयाद्री
बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र कायदा, १९९६ (पेसा) अंतर्गत असलेले १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर निवड झालेल्या उमेदवारांना यादी पाहता येणार आहे.
राज्यातील ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. टीसीएस कंपनीची परीक्षेसाठी निवड करण्यात आली. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत या परीक्षा ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या. तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसाअंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांतील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा) १७ संवर्गातील सरळसेवा पदभरती संदर्भात विशेष याचिका आहे. या याचिकेच्या निर्णयास अधिन राहून निवड व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार असल्याचे राज्याच्या प्रभारी राज्य परीक्षा समन्वय सरिता नरके यांनी सांगितले.