लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील तलाठी दीपक भिमाजी साठे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सदर तलाठ्याने तक्रारदाराकडून खरेदिखताची नोंद लावून देण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार हा गरीब मेंढपाळ असून त्याने रकमेबाबत सवलत देण्याची विनंती केली. मात्र तलाठी साठे यांनी ती मान्य न करता दहा हजार रुपये आणले तरच नोंद लावून देतो असे ठणकावून सांगितले.
तक्रारदाराने पैशांची तरतूद न झाल्याने व अन्याय सहन न करता या प्रकाराची माहिती अॅड. निळकंठ दशरथ कुलाल व अॅड. तुषार हिलाल यांना दिली. त्यांनी तक्रारदारासह थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार अधिकारी अजित त्रिमुखे व राजू आल्हाट यांच्या पथकाने सापळा रचून तलाठी साठे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अॅड. तुषार हिलाल व अँड.निळकंठ कुलाल म्हणाले की, गरीब मेंढपाळ व शेतकर्यांकडून सरकारी अधिकारी लाच मागतात, ही अत्यंत लाजिरवाणी व अन्यायकारक बाब आहे. अशा भ्रष्ट अधिकार्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या कारवाईतून स्पष्ट संदेश गेला पाहिजे की, यापुढे कोणताही अधिकारी गरीब जनतेकडून लाच मागण्याचे धाडस करू नये. तसेच, यापुढे कोणत्याही गरीब शेतकरी अथवा मेंढपाळास विनाकारण सरकारी अधिकारी पैसे मागत असल्यास आम्ही (अॅड. हिलाल व कुलाल असोसिएट) त्यांना विनामूल्य कायदेशीर मदत करण्यास सदैव तयार आहोत.