कोपरगाव | नगर सह्याद्री
सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच मागणार्या कोपरगावच्या तलाठ्यास व त्याच्या साथीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना गेल्या ०२ जानेवारी रोजी कोपरगाव येथे घडली.
कोपरगाव येथे ३७ वर्षीय फिर्यादीने साई रेसिडेन्सी नावाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर एक सदनिका २८ सप्टेंबर २०२२ रोजी खरेदी केली आहे. या सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्यावर करावी अशी मागणी फिर्यादीने कोपरगाव वर्ग-३चा तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे (वय-४०) यांच्याकडे केली. त्यासाठी फिर्यादीने अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु गणेश सोनवणे याने या कामासाठी मध्यस्थ असलेल्या करण नारायण जगताप (रा. कोपरगाव) याच्याकरवी सहा हजार ५०० रुपयांची मागणी केली. तशी तक्रार फिर्यादीकडून अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ०२ जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झाली. मध्यस्थ करण जगताप याने तलठ्यासाठी सहा हजार रुपये व स्वत:साठी ५०० रुपये मागितले. या संदर्भात त्याच दिवशी विभागाने या संदर्भात पडताळणी केली.
त्यानुसार कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी अपार्टमेंट येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे करण जगताप सहा हजार ५०० रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पंचासमक्ष पकडला गेला. या दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे अहिल्यानगर युनिटचे तपास अधिकारी तथा विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या योजनेनुसार पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चा. पोहेकॉ हारून शेख यांच्या पथकाने केली.