पारनेरकरांनी थोपविलं लंके यांचे प्रस्थापित होणं | सुजय विखेंचे सुदर्शन चक्र चालले | बुक्का अन् वाजंत्री गँगने दाखवला हिसका
सारिपाट / शिवाजी शिर्के
प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य गुरुजीचा पोरगा लढतोय आणि हेच त्यांना खटकतंय, असं भावनिक आवाहन करतानाच मागील निवडणुकीत विजय औटी यांच्याकडून अपमानीत झालेल्यांची मोट बांधत निलेश लंके यांनी आमदारकी जिंकली. यानंतर विरोधकांना वाजंत्री- बुक्का गँग अस हिणवत त्यांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. गावागावात कार्यकर्ते गँगवार करु लागले आणि त्यांना आवर घालण्याचे सोडून त्यांना मूक संमती देण्याचे काम लंके यांच्याकडून झाले. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात औटी यांच्यासारखेच वातावरण पेटवले गेले आणि शेवटच्या दोन दिवसात लक्ष्मीदर्शन घडवत मताधिक्य घेतले. आता पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी सामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली असती तर कदाचित आजचा निकाल वेगळा आला असता. मात्र, पत्नीला उमेदवारी देऊन प्रस्थापित राजकारणी होण्यास निघालेल्या खा. निलेश लंके यांना रोखण्याचे काम मतदारांनी केले. त्यात काशिनाथ दाते यांच्यासारखा संयमी आणि पोक्तविचारांचा उमेदवार समोर येताच ज्येष्ठांसह सार्यांनीच त्यांना पसंती दिली. त्यात सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आवश्यक ती सारी रसद दाते यांच्यासाठी पुरवली. लंके यांची स्वत:ची यंत्रणा लोकसभा निवडणुकीसारखी फारशी गांभिर्याने काम करताना दिसली नाही. मताधिक्य मिळालेच तर त्याचे श्रेय आपल्याला मिळणार नसल्याची भावनाही लंके यांच्या काही पदाधिकार्यांमध्ये निर्माण झाली. त्यांनी काम करत असल्याचा दिखावा केला आणि त्याची किंमत निलेश लंके यांना मोजावी लागली.
काशिनाथ दाते यांची संयमी भूमिका त्यांना विजयश्री देऊन गेली!
अवघे पंधरा दिवस बाकी असताना उमेदवारी मिळाल्यानंतर काशिनाथ दाते यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत मुत्सद्दीपणाने निवडणूक हाती घेतली. लंके विरोधकांची मोट बांधली! नंदकुमार झावरे यांच्या पहिल्या निवडणुकीपासून ते विजय औटी यांच्या शेवटच्या निवडणकीपर्यंतचा अनुभव त्यांच्याकडे होताच! त्यातून या तिघांच्याही सहवासात आलेल्या प्रत्येकाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याच जोरावर त्यांनी संघटन केले. जिवाभावाच्या कार्यकर्त्यावर जबाबदारी टाकली आणि पायाला भिंगरी बांधली. सोबतीला अजित पवार आणि सुजय विखे पाटील यांची रसद होतीच! त्यातून विजयश्री खेचून आणण्यात ये यशस्वी झाले.
सुजय विखे यांनी पडद्याआड बजावली लाखमोलाची भूमिका!
लंके यांना पराभूत करायचे असेल तर पारनेरमध्ये एकास एक लढत होऊन काहीच उपयोग नसल्याचे सुजय विखे यांनी हेरले होते. याशिवाय नगर तालुक्याची निर्णायक मते कोणाला जातील आणि ती रोखण्यासाठी काय करावे लागेल याचा अभ्यासही त्यांनी केला. माजी आमदार विजय औटी यांची उमेदवारी काशिनाथ दाते यांची मते घेण्यासाठी आली असल्याचे समोर येताच सुजय विखे यांनी विजू औटी यांना दाते यांना पाठींबा देण्यास सांगितले. विजू औटी यांची रसद दाते यांना मिळाली असतानाच विजय भास्करराव औटी यांच्या उमेदवारीचा स्पॉन्सर कोण आहे हे जनतेसमोर आले. त्यातून विजय औटी यांना जाणारी मते आपसूकपणे काशिनाथ दाते यांच्याकडे आली. म्हणजेच माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचा पाठींबा आणि त्याचवेळी माजी आमदार विजय औटी यांची उमेदवारी कोणाची मते खायला झाली आहे हे एकाचवेळी समोर आल्याने काशिनाथ दाते यांच्यासाठी पोषक वातावरण तयार झाले.
संदेश कार्ले यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत मोजावी लागली!
सामान्य कुटुंबातून आलेल्या संदेश कार्ले यांच्याकडे मोठा जनाधार आहे. कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी भरण्याआधी तालुक्यातील आणि मुंबईतील नेत्यांच्या भेठीगाठी घेतल्या. मात्र, त्यांना थोपविण्याचे, समजूत काढण्याचे प्रयत्न करण्याचे सोडून त्यांची खिल्ली उडविण्याची भाषा करण्यात आली. तुझी ग्रामपंचायत तुझ्या ताब्यात ठेवत नाही आणि तुला झेडपीत देखील निवडून येऊ देत नाही, अशी आव्हान दिल्यासारखी भाषा लंके यांच्याकडून वापरली गेली. त्यातून चर्चेची दारेच बंद झाली. त्यामुळे दुखावलेल्या संदेश कार्ले यांनी उमेदवारी कायम ठेवली. कार्ले यांची उमेदवारी नसती तरी आज पत्नीच्या पराभवाने जी नामुष्की झाली ती झाली नसती!
त्यांचा तुकाराम गडाख होण्याची चर्चा झडू लागली!
पानसवाडीत एक प्रकरण घडलं आणि त्याचा आधार घेत तुकाराम गडाख यांनी सहानुभूती मिळवली. त्यातून हेच तुकाराम गडाख पुढे खासदार झाले. खासदार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यातून त्यांनी जाईल त्या गावात स्वत:चीच टिमकी वाजवायला आणि बाकी सार्यांना हिणवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची अधोगती झाली आणि त्यानंतर एकाही निवडणुकीत त्यांना यश आले नाही. कधीकाळी डोक्यावर घेतलेल्या तुकाराम गडाख यांचे नाव आता जनता विसरुन गेलीय. निलेश लंके यांचा प्रवास देखील काहीसा असाच राहिलाय. विजय औटी यांच्या विरोधात आमदारकी आणि सुजय विखे यांच्या विरोधात खासदारकी मिळविल्यानंतर स्वत:च्या पत्नीला ते आमदार करु शकले नाही. करिष्मा संपल्यागत त्यांची अवस्था झाली असल्याने त्यांचा आता तुकाराम गडाख होऊ शकतो अशी जाहीर चर्चा लागलीच झडू लागली आहे.
ठेकेदारांच्या हातचे बाहुले झाले अन्…..
विजयराव औटी हे तीनदा आमदार झाले. दुसर्या आणि तिसर्या टर्ममध्ये आमदार म्हणून काम करताना त्यांनी ठेेकेदार हाताशी धरले. त्यांच्याच माध्यमातून निवडणूकांचे नियोजन त्यांनी केले. ठेकेदारांनी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने काम करताना टक्केवारीच्या मोहात औटींना टाकले. त्यातून कार्यकर्ते आणि आमदार यांच्यातील दुरावा वाढत गेला. त्याच मार्गाने निलेश लंके यांची वाटचाल सध्या चालू आहे. ठेकेदारांच्या इशार्यावर काम करणारे लंके हे कार्यकर्त्यांसह जनतेच्या मनातून उतरण्यास ठेकेदारांची ही टोळीच कारणीभूत ठरली असल्याची चर्चा त्यांच्याच समर्थकांकडून केली जात आहे.
भाकरी फिरवतानाच आत्मपरीक्षणाची गरज!
खुषमस्कर्यांच्या टोळीचे सरदार अशीच काहीशी ओळख निर्माण झालेल्या निलेश लंके यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विजय औटी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी होती आणि त्याचेच भांडवल करत लंके यांनी आमदारकीची निवडणूक केली. त्यात ते यशस्वी होताच त्यांना आमदारकीचा दर्प आला. त्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही सत्तेची हवा दुप्पट गेली. गावागावात बेरजेचे राजकारण करण्याचे सोडून लाठ्या-काठ्या घेतल्या जाऊ लागल्या. लंके यांचा त्यात काहीच संबंध नसला तरी त्यांनी या कार्यकर्त्यांना आवर घालण्याचे काम केले नाही. याचाच अर्थ त्यांची मुकसंमती समजली गेली. पाच वर्षापूर्वीची आमदारकी आणि आताची लोकसभा याला मताधिक्य देणारे आताच्या आमदारकीला विरोधात का गेले याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
लंके घेऊन जाणार होते आमदार, पण प्रत्यक्षात नेले सुजय विखेंनी!
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील बारा आमदार मी मुंबईत घेऊन येणार, असा शब्द खा. निलेश लंके यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला होता. याचाच अर्थ लंके हे जिल्ह्याचे नेते म्हणून स्वत:ला संबोधीत करु लागले होते. आता निकाल समोर आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दहा आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. बारा आमदार घेऊन जाणार असल्याचे सांगणारे लंके हे स्वत:च्या पत्नीचा पराभव देखीली रोखू शकले नाही. विधानसभा निवडणूक चालू असताना नगर दक्षिणेत फारसे लक्ष न देता सुजय विखे पाटील यांनी त्यांचा करिष्मा दाखवून दिला.
निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या सार्यांचाच पराभव!
लोकसभा निवडणुकीवेळी नगर मतदारसंघातून सुजय विखे यांना पराभूत करण्यासाठी आणि नीलेश लंके यांना विजयी करण्यासाठी अनेकांनी मोहीम राबविली. त्यात प्रामुख्याने बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), अभिषेक कळमकर (नगर शहर), प्रताप ढाकणे (शेवगाव-पाथर्डी), शंकरराव गडाख (नेवासा), प्रभावती घोगरे (शिर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदा) आदींचा समावेश होता. या सार्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पहावा लागला. यातील एकाचाही पराभव लंके हे रोखू शकले नाहीत. कर्जत-जामखेडमध्ये रोहीत पवार यांचा विजय हा अवघा दोन-तीनशे मतांचा आहे. येथून राम शिंदे हे लंके यांच्यासाठी लोकसभेला पोषक राहिले होते हेही महत्वाचे! याचाच अर्थ ज्यांनी- ज्यांनी लंके यांच्यासाठी मदतीची भूमिका घेतली त्या सर्वांना पराभव चाखावा लागलाय!
पारनेरमध्ये कोणा एकाने नव्हे तर जनतेनेच रोखले लंके यांना!
काशिनाथ दाते यांच्या विजयासाठी अजित पवार आणि सुजय विखे यांनी पारनेरमध्ये सर्वांची मोट बांधली. त्यांना आवश्यक ते शब्द दिले आणि रसदही दिली. त्यातून सर्वच लंके विरोधक एक झाले. निकाल लागल्यानंतर काशिनाथ दाते यांना विजयी घोषीत करताच ‘किंगमेकर’ या मथळ्याखाली अनेकांच्या पोस्ट पडल्या. मात्र, काशिनाथ दाते यांनी संयमी भूमिका घेत सर्वांना समजून घेत, सन्मनाची वागणूक दिली. त्याशिवाय लंके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गावागावात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली होती. काशिनाथ दाते हा पोक्त आणि ज्येष्ठ विचारांचा चेहरा समोर दिसला आणि ती नाराजी गावागावातून उत्स्फूर्तपणे मतदानातून बाहेर आली.
उमेदवारांना मिळालेली मते-
काशिनाथ दाते – १ लाख १२ हजार ७७५ (विजयी)
राणीताई लंके – १ लाख १० हजार ३६९
संदेश कार्ले – १० हजार ६४५
विजय भास्कर औटी – २ हजार ४६४
विजय सदाशिव औटी – ८५८
सखाराम सरक – ३ हजार ५७२