अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने कल्याण रोड शिवाजीनगर येथे डेंगू मुक्त अभियान
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहर डेंगू मुक्त अभियानाचा १० वा आठवडा असून या अभियानानिमित्त शहरांमधील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच नागरिकांच्या घरातील पाणी साठे तपासले जात असून डेंगूसदृश अळ्या आढळल्यास त्या नष्ट करून औषध फवारणी व पाण्यामध्ये अबेट औषध टाकण्याचे काम केले जाते. डेंगूचा डास हा दिवसा आणि गुडघ्याखाली चावत असतो. कल्याण रोड परिसरामध्ये पाणी हे तीन ते चार दिवसांनी येत असल्यामुळे या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करून ठेवत असतात. शिवाजीनगर परिसरामध्ये कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम तोफखाना आरोग्य केंद्राने करावे. नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी करावी. नागरिकांनी देखील महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सहकार्य करावे, जेणेकरून आपला परिसर आजारमुक्त होईल. पावसाळ्यामध्ये साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाच्या वतीने डेंगू मुक्त अभियान राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हिच प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने कल्याण रोड, शिवाजीनगर येथे डेंगू मुक्त अभियानानिमित्त नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी साठ्याची तपासणी करताना आयुक्त यशवंत डांगे समवेत माजी नगरसेवक सचिन शिंदे, श्यामअप्पा नळकांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. सृष्टी बनसोडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, जयश्री ढवळे, डॉ. कांचन रच्चा आदींसह विद्यार्थी, नागरिक, शिक्षक उपस्थित होते.
माजी नगरसेवक सचिन शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डेंगूमुक्त अभियान सुरू केले असून ही कौतुकाची बाब आहे. कल्याण रोड शिवाजीनगर परिसरातील नागरिक कष्टकरी हातावरती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यांच्यासाठी कल्याण रोड परिसरामध्ये हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे या नावाने आपला दवाखाना सुरू झाला असून या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दररोज या ठिकाणी ५० ते ६० रुग्ण या दवाखान्याचा लाभ घेत आहेत, असे ते म्हणाले.
माजी नगरसेवक श्यामआप्पा नळकांडे म्हणाले की, मनपाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डेंगू मुक्त अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत असून नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कुठलीच योजना किंवा अभियान यशस्वी होऊ शकत नाही. तरी नगरकरांनी अहिल्यानगर डेंगूमुक्त अभियानामध्ये सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर म्हणाले की, आयुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डेंगूमुक्त अभियान राबवले जात असून घरापर्यंत आरोग्याच्या सेवा घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सण-उत्सवाचे दिवस सुरू असून ते नागरीकांना आनंदात साजरे करता यावे यासाठी या काळामध्ये नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहणे गरजेचे आहे.
डेंगूमुक्त अभियान सुरू असताना सकाळी पावसाच्या सरी सुरू झाल्या. मात्र आयुक्त यशवंत डांगे यांनी भर पावसामध्ये घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी केली. तसेच आशा सेविकांनी डेंगू आजाराबाबत पथनाट्य सादर केले व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.