बीड । नगर सहयाद्री:-
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्याने जिल्हा ढवळून निघाला. बीडचा बिहार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. बीडमध्ये अराजकता, दहशतीचे आणि गुंडागद वाढली आहे. खंडणी वसूल करण्यात येत आहे.
गुन्हेगारी वाढलेली आहे. त्याला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घडामोडीवर खासदार सोनवणे यांनी संतापव्यक्त केला आहे. त्यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला. अजितदादांनी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, असे ते म्हणाले. अर्थात पालकमंत्री कुणीही व्हावं. कुणालाही करावं. पण संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला अटक करा, अशी मागणी त्यांनी केली
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काही फरक पडणार नाही, असं खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. मागील सरकारमध्ये धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रिपद दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली, असा आरोपही त्यांनी केला. बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली.
सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात विष्णू चाटेनी आत्मसमर्पण केले. त्यांनी सरेंडर केले की त्यांना अटक झाली याची माहिती पोलिसांनी द्यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माईंड कोण आहे ,त्याला कधी शोधून काढणार? हत्येला आज 18 दिवस झालेॉ, मग तीन आरोपी अजूनही कसे फरार आहेत असा प्रश्नही सोनवणे यांनी विचारला.
शनिवारी बीडमध्ये मोर्चा
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण होत आहेत. देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपींना अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला आहे.