मुंबई / नगर सह्याद्री –
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ता चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीतीसंगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दाखल झाले होते. त्यावेळी तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले. काका – पुतण्याच्या भेटीदरम्यानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला.
रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकाचं दर्शन घे, असंही म्हटलं. त्यानंतर रोहित यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांचा कर्जत-जामखेडमध्ये थोडया मतांनी विजय झाला आहे. यावरून अजित पवार यांनी “ढाण्या…थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं?”, असे रोहित पवार यांना म्हंटले.
रोहित पवार काय म्हणाले?
‘माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती’, असे अजित पवार यांनी विधान केले. त्यावर रोहित पवार म्हणाले की, “नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. यासाठी त्यांचे मी अभिनंदन देखील केलं,”असं रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजय
कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली. रोहित पवार यांचा १२४३ मतांनी विजय झाला. ट्रम्पेट या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना ३४८९ मते मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचे म्हंटले जाते. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना ३९२ तर नोटाला ६०१ मते मिळाली.