Crime News:लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलेवर संशय घेऊन तिला पार्टनरने भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर भाजलेल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. मृत महिलेचे नाव वनजाक्षी (वय ३५) असून, ती काही काळापासून विठ्ठल नामक व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. विठ्ठल हा कॅब ड्रायव्हर असून त्याला दारूचे व्यसन होते.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही विवाहित होते. एकत्र राहत असताना विठ्ठल वनजाक्षीवर संशय घेत होता आणि तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. वनजाक्षीने विठ्ठलचा त्रास सहन न होऊन काही महिन्यांपूर्वी त्याच्यापासून दूर राहायला सुरुवात केली होती. दरम्यान, तिने दुसऱ्या पुरुषाशी मैत्री केली होती. ही बाब विठ्ठलच्या लक्षात येताच त्याने वनजाक्षीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
घटनेच्या दिवशी वनजाक्षी तिच्या नवीन प्रियकरासोबत कारमधून जात असताना विठ्ठलने त्यांच्या गाडीचा पाठलाग करत थेट रस्त्यात अडवले. त्याने तिघांवर पेट्रोल ओतले. वनजाक्षीचा प्रियकर व कारचालक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र विठ्ठलने वनजाक्षीचा पाठलाग करत तिला पुन्हा पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिले. जखमी अवस्थेतील वनजाक्षीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीव्र भाजल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अमानुष कृत्यामुळे बंगळुरू परिसरात खळबळ उडाली आहे.