सुपा | नगर सह्याद्री
सुपा पोलीस ठाणे हद्दीतील टोलनाका परिसरात बुधवारी (23 जुलै 2025) पहाटे चोरीच्या संशयावरून स्थानिकांनी राठोड (पूर्ण नाव अज्ञात) या तरुणाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, वैद्यकीय तपासणी न करता पोलीस ठाण्यात बसवलेल्या या तरुणाचा काही वेळातच मृत्यू झाला. ही घटना कस्टोडियल डेथ म्हणून नोंदवण्यात आली असून, तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात येणार आहे.
प्रत्यक्षदशनुसार, पहाटे 2 वाजता राठोड आणि त्याचे साथीदार वाहनातून सुपा परिसरात आले. संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिकांनी राठोडला पकडले, तर त्याचे साथीदार पळाले. जमावाने राठोडला मारहाण केली, जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सुपा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, पण वैद्यकीय तपासणी न करता थेट पोलीस ठाण्यात आणले. काही वेळातच त्याची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात पोलिसांचा गंभीर हलगर्जीपणा उघड झाला. ताब्यात घेतलेल्या संशयिताची वैद्यकीय तपासणी अनिवार्य असताना, प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या उपस्थितीतही हे पाळले गेले नाही. मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात होणार आहे. राठोडच्या ओळखीसह नातेवाइकांचा शोध सुरू आहे.