अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १० दुचाकींना धडक दिली. ही घटना शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात गुरुवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घटनेची भीषणता दिसून येत आहे.
शहरातील गर्दीच्या ठिकाण असलेल्या महात्मा फुले चौकात सायंकाळी एक टेम्पो भरधाव वेगात आला. टेम्पोने पहिले रस्ता क्रॉस करीत असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला लावलेल्या ८ ते १० दुचाकींना जोराची धडक दिली. टेम्पो चालकाला फीट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे समजते. ही बाब चालकाच्या शेजारील लिनरच्या लक्षात आल्याने त्याने चालकाला बाजूला करीत वाहन थांबवले.
त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करत चालकाला टेम्पोतून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. धडक दिलेल्या दुचाकी या रस्त्याच्या कडेला लावलेल्या होत्या. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. मात्र या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चौकात यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्याने भीतीची भावना निर्माण झाली आहे.