
निघोज / प्रतिनिधी
रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत आहे. विकासप्रक्रिया खंडीत करुण ठेकेदारीचा व्यवसाय करीत दादागीरी सुरु असून याचा बिमोड करण्यासाठी महायुतीला उद्याच्या निवडणुकीत जनतेने पाठबळ देण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी डावा कालवा पाटाचे अस्तरीकरण भुमिपूजन कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी ८३ कोटीचा निधी नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार काशिनाथ दाते सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष आर एम कापसे सर, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, माजी सभापती गणेश शेळके, डॉ.प्रदिप दाते, डॉ. भाऊसाहेब खिलारी, भास्करराव उचाळे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सोनाली सालके पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे, दिनेश बाबर, ज्येष्ठ नेते दादाभाऊ वारे, अश्वीनी थोरात, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊलीशेठ वरखडे , तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश लाळगे, भिमराव लामखडे आदी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार विखे पाटील म्हणाले जाणत्या राजाने अनेक वेळा पारनेर दौरा केला मात्र त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवीता आला नाही उलट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाणी अडवीण्याचे पाप त्यांनी केले आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सातत्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला पाठबळ देत सातत्याने जनतेच्या हितासाठी विकासाभिमुख निर्णय घेतले आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशिनाथ दाते सर यांनी जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळण्यासाठी सातत्याने सकारात्मक भुमिका घेतली असून गेली चाळीस वर्षात प्रथमच पाटपाण्याच्या अस्तरीकरण होण्यासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून हे काम वर्षभरात पुर्ण होणार आहे. हे काम प्रलंबित राहील्याने पाणी झिरपत होते. पाणी सुटल्यानंतर पाचशे क्युसेक्स पाणी जाग्यावर वाया जात होते. हे काम पुर्ण झाल्यानंतर जवळपास पाचशे क्युसेक्स विसर्ग वाढणार आहे. याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.
पारनेरची कामधेनू पारनेर साखर कारखाना माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरु केला. तो कारखाना मोठा होण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब भगत, माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र तोच कारखाना विकण्याचे पाप येथील काही पुढाऱ्यांनी केले.कामगार शेतकरी यांना आर्थिक पाठबळ देणारा हा कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू होईल यासाठी आपण प्रयत्नशील असून शेतकरी हिताचे निर्णय सुरुच राहणार आहेत. कांद्याला भाव मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नशील असून लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शरद सोनवणे, आमदार काशिनाथ दाते सर यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेला पाठपुरावा व त्यांनी हा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल विखे पिता पुत्रांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. सहकार क्रांती, शैक्षणिक क्रांती, वैद्यकीय क्रांती याचबरोबर विखे कुटुंबाने जलक्रांती केली असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने सहकाराच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे तेच काम नामदार विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील करीत असून महायुतीच्या सरकारने अतिशय जलद विकासकामे केली असून यापुढील कार्यकाळात महायुती शिवाय जनतेला पर्याय नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.
यावेळी निघोज ग्रूप ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन , अल्पसंख्याक समाज यांच्या वतीने विखे पाटील व मान्यवरांचा सचिन पाटील वराळ व राळेगण थेरपाळ लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू साबळे यांनी केले शेवटी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी आभार मानले.
जाणता राजा म्हणून शरद पवार व रेडबुलचे आपल्या भाषणात वारंवार उल्लेख करीत खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता नामदार विखे पाटील यांनी जोरदार टिका केली. आजपर्यंत पाणी आडवण्याचे काम पुण्याचे पुढारी करीत होते. मात्र यामध्ये आमदार शरद सोनवणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सकारात्मक भुमिका घेऊन एक प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका घेतली आहे. यापुढे पुण्याच्या पुढाऱ्यांनी कितीही पाण्यासाठी अडवाअडवी केली तरी महायुतीचे सरकार पाटपाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याने महायुतीचे सरकारच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगताच उपस्थीतांनी टाळ्या वाजवून त्यांच्या भाषनाला दाद दिली.



