पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई
राहाता । नगर सहयाद्री
ममदापुर (ता. राहाता) येथील गोवंशीय जनावरांची अवैधरित्या कत्तल करणाऱ्या टोळीला अहिल्यानगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सलग तिसरी मोठी कारवाई करत समाजात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरोधात कठोर पावले उचलली आहेत.
टोळीप्रमुख नियाज अहेमद फकीर महंमद शेख (कुरेशी), सद्दाम फकीरमहंमद शेख (कुरेशी), जकरीया शब्बीर कुरेशी, वसीम हनिफ कुरेशी, कैफ रऊफ कुरेशीअरबाज अल्ताफ कुरेशी सर्व ( रा. कुरेशी मोहल्ला, ममदापुर, राहता) अशी त्यांची नावे आहे. या टोळीने २०१४ ते २०२४ दरम्यान विविध गंभीर गुन्हे केले आहेत. यात गोवंश कत्तल, गोमांसाची अवैध वाहतूक, अग्नीशस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापतीस कारणीभूत होणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध लोणी व राहाता पोलीस ठाण्यांत एकूण १७ गुन्हे दाखल आहेत.
लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कैलास वाघ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांनी चौकशी करून शिफारस केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक व हद्दपार प्राधिकरण अधिकारी श्री. सोमनाथ घार्गे यांनी सखोल चौकशी करून ६ जणांच्या टोळीला एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.