पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील सुपा शहर, एक महत्त्वपूर्ण बाजारपेठेचे ठिकाण, आता नव्या वैभवाने नटणार आहे. शहरातील खडकवाडी येथील वनजमिनीवर बालक आणि वृद्धांसाठी नाना-नाणी पार्क’ उभारण्यास राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रयत्नांमुळे 4 कोटी 61 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. सुपा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा रोकडे यांनी ही माहिती दिली. लवकरच या उद्यानाचे काम सुरू होणार असून, यामुळे सुपा शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.
या उद्यानामुळे स्थानिक बालकांना खेळण्यासाठी आणि वृद्धांना विश्रांतीसाठी आकर्षक आणि सुरक्षित जागा उपलब्ध होईल. सुपा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या प्रकल्पामुळे सुपा शहराचा विकास तर होईलच, शिवाय स्थानिकांना मनोरंजन आणि सामाजिक मेळाव्यासाठी एक नवीन व्यासपीठ मिळेल. हा प्रकल्प सुपाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालणारा ठरेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सुपा शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल: सरपंच रोकडे
सुपा शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून नवी ओळख मिळाली आहे. सुपा येथे होत असलेले नाना-नाणी पार्क हे बालकांसाठी व वृद्धांसाठी महत्त्वाचे ठरणार असून एक सुरक्षित पार्क आम्ही तयार करणार असून लवकरच त्याचे काम सुरू करणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सुपाचे सरपंच मनिषा रोकडे यांनी सर्वांचे आभार मानले.