अकोले । नगर सहयाद्री
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सुनीता भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भांगरे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्कात होते आणि अखेर भाजपात प्रवेश केल्याने येणाऱ्या निवडणुकींचे राजकीय गणित आता जुळले असल्याची चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भांगरे यांच्या प्रवेशामुळे भाजपला उमेदवार मिळाला आहे. यापूर्वी सुनीता भांगरे जिल्हा परिषद सदस्य होत्या. भांगरे कुटुंबाने याआधी अकोल्यात विधानसभा निवडणुकीसाठी अमित भांगरे यांना राष्ट्रवादीतून पाठिंबा दिला होता, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भांगरे यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपाचा मार्ग स्वीकारला आहे.
जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बघितल्यास, लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर पक्षाला जिल्ह्यात गळतीचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आता राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असलेल्या सुनीता भांगरे यांचाही पक्ष बदलल्याने, राष्ट्रवादी गटाला आगामी निवडणुकांसाठी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
प्रवेशानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोले तालुक्यातील ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे जाहीर केले. मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता भांगरे, दिलीप भांगरे आणि अकोले तालुक्यातील अनेक सरपंच व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जेष्ठ नेते सिताराम भांगरे, कोपरगावचे माजी नगराध्यक्ष सुहास वहाडणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



