पुणे। नगर सहयाद्री-
बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार लढतीकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या लढतीत नणंद सुप्रिया सुळे यांनी भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. पराभवानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) मोठा धक्का बसला. तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार आहेत.
सोमवार दि.१० जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला.
पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोठा ठराव करण्यात आला. राज्यसभेच्या रिक्त होणा-या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण तसेच राजकारणाची आवड असल्याचा दावा करत त्यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी केली आहे.