ढवळपुरी गटात राजकारण फिरणार
पारनेर/ नगर सह्याद्री :
सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात पारनेर येथे मोठे शक्ती प्रदर्शन करत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने तालुक्याच्या राजकारणात स्थित्यंतर होणार हे लक्षात आलं होत. भाळवणी येथील मोठे उद्योजक वैभव डेरीचे सर्वेसर्वा संदीप रोहकले यांनी सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. संदीप रोहकले हे गेल्या आठ वर्षापासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते परंतु न्याय मिळत नसल्याने ते नाराज होते. स्थानिक राजकारणात संदीप रोहकले यांचे मोठे वजन आहे भाळवणी परिसरात शेतकरी हितासाठी ते नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. दूध व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे. संदीप रोहकले यांनी अचानकपणे सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे खासदार निलेश लंके गटाला पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात मोठा धक्का बसला आहे. रोहकलेंसारखे एक सर्वसमावेशक नेतृत्व शिवसेनेत आल्यामुळे सुजित झावरे यांची भाळवणी परिसरात मोठी ताकद वाढली आहे. हा प्रवेश कार्यक्रम वासुंदे येथे झाला. यावेळी भाळवणी गावचे उद्योजक संदीप कपाळे माजी सरपंच ठकचंद रोहकले माजी उपसरपंच पिनु रोहकले तसेच वासुंदे येथील ग्रामस्थ शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजित झावरे पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील राजकारणच फिरले आहे कारण त्यांनी पारनेर येथे घेतलेल्या सभेला 15000 पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावल्याने त्यांची खरी तालुक्यातील ताकद दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुजित झावरे यांच्या गटात मोठ्या संख्येने आणखीन प्रवेश होतील आता हे सांगण्यासाठी राजकीय जाणकाराची किंवा भविष्यकाराची गरज राहिलेली नाही.
संदीप कपाळे यांनी लंके यांचा समर्थक फोडला..
भाळवणी परिसरात खासदार निलेश लंके यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे उद्योजक संदीप रोहकले यांना शिवसेना पक्षात सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश देत उद्योजक संदीप कपाळे यांनी भाळवणी परिसरात मोठी राजकीय खेळी खेळली आहे. आता संदीप रोहकले हे सुजित झावरे पाटील यांचे भाळवणी गणातील संभाव्य उमेदवार असतील ते सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही.
उद्योजक संदीप रोहोकले यांच्या प्रवेशाचा होणार फायदा
उद्योजक संदीप रोहकले हे शांत संयमी व प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून भाळवणी परिसरात ओळखले जातात सामाजिक कामांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य वर्गामध्ये आपली एक चांगली ओळख निर्माण केली असून शेतकरी वर्गाशी दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा असलेला संपर्क हा खऱ्या अर्थाने त्यांची जमेची बाजू आहे शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश करत सुजित झावरे पाटील यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संदीप रोहकले यांच्या प्रवेशाने झावरे पाटील यांना ढवळपुरी जिल्हा परिषद गटातच मोठा फायदा होणार आहे.



