नगरमध्ये सुजय विखे-नीलेश लंके यांच्यात शेवटच्या टप्प्यातही चुरस | कोणता आश्वासक चेहरा मतदारांना भावणार?
पारनेर अन् नगर शहराच्या मताधिक्यावरच विजयाचे गणित!
सारिपाट / शिवाजी शिर्के
लोकसभेच्या नगर लोकसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असून या निवडणुकीचा केंद्रबिंदू पारनेर तालुकाच असणार आहे. पारनेरमधून मिळणार्या मताधिक्यावर नीलेश लंके यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. दुसरीकडे नगर शहरातून मिळणारे संभाव्य मताधिक्य ही सुजय विखे यांच्या जमेची असणार आहे. त्यामुळेच पारनेरमधून लंके यांना मिळणारे मताधिक्य कमी करणे यासाठी महायुतीला काम करावे लागेल तर नगर शहरातून विखे यांचे मताधिक्य कमी राहील यासाठी महाविकास आघाडीला काम करावे लागणार आहे. विधानसभेच्या अन्य चार मतदारसंघात विखे अथवा लंके यांच्यापैकी कोणालाही मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी लंके यांची भिस्त पारनेरवर तर विखे यांची भिस्त नगर शहरावर असणार हे नक्की!
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते प्रचाराच्या तोफा थंड होण्याची वेळ आली असताना नगरमध्ये दोन्ही प्रमुख उमेदवार अन् त्यांच्या समर्थकांकडून चर्चा झाली ती स्थानिक प्रश्नांची! खासदार म्हणून निवडून दिले तर तुम्हाला पाणी देईल असं बोलताना पाणी दिलं नाही तर ताईत घेईन अन् धरणच उडवून देईल अशी भाषा देखील पहिल्यांदाच नगरकरांना ऐकण्याची संधी मिळाली. श्रीगोंदा- कर्जतकरांना पाणी देण्यात कोणी अडवे आले तर कॅनोलचं काय करायचं ते पाहू हेही ऐकायला मिळालं. मनमाड रस्त्याचा प्रश्न मांडताना त्यावर विखेंना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, याच रस्त्याच्या ठेकेदाराकडे टक्केवारी कोणी मागीतली अन् तो कोणामुळे पळून गेला या आरोपाचे उत्तर समोर आले नाही.
नगर- पाथर्डी रस्त्याच्या मुद्यावर केलेल्या लढाईचा मुद्दा लंके यांनी मांडला. मोहटादेवी दर्शनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, महिलांचा सन्मान केल्याचे सांगताना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि पारनेरच्या महिला आरोग्य अधिकारी यांचा छळ कसा आणि कोणी केला याचाही आरोप झाला. कोरोना कालावधीत कोवीड सेंटरच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवताना त्याच कोविड सेंटरमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याला बदेम चोप कोणी दिला याचीही चर्चा झडली.
एकूणच निवडणूक जाहीर झाल्याच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यत नीलेश लंके यांनी पारनेरमध्ये गेल्या साडेचार वर्षात कसा आणि कोणत्या-कोणत्या घटकांना त्रास दिला याचीच चर्चा झडली! त्यातून कोण- कोण रस्त्यावर आले याची माहितीही समोर आली आणि जनतेने त्यावर चर्चा देखील केली. दुसर्या बाजूने सुजय विखे यांच्या विरोधातही वातावरण निर्माण केले गेले. फोन न घेणं, हाच एकमेव मुद्दा विखे यांच्या विरोधात शेवटपर्यंत मांडला गेला. आपण किती सहजपणे उपलब्ध होतो हे लंके व त्यांच्या समर्थकांनी मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना दोघांकडूनही डावपेच टाकले जात आहेत. जाहीर सभांचा धुराळा संपताना आता खर्या अर्थाने मतांची बेरीज वाढेल कशी याची जुळवाजुळव दोन्ही बाजूने केली जाणार आहे.
‘ज्यांना’ पोसले, ‘त्यांनीच’ गळ्यात पाय टाकले!
लोकसभेच्या या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात जाण्याची भूमिका काहींनी घेतली. नगर तालुक्यातील छोट्याशा गावातील एक तरुण असाच चळवळीतून पुढे आला. बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबत त्या तरुणाच्या वडिलांचे जुने संबंध! त्या संबंधातून या कुटुंबाला ताकद देण्याची भूमिका स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी घेतली आणि त्यातूनच मग त्याला समाजकारण आणि राजकारणात ताकद देण्याचे काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. त्यातूनच जिल्हा परिषदेत त्याला संधी देण्यात आली. बांधकाम समितीचे सभापतीपद देण्यात आले. त्यातून त्याने काय- काय केले हे सर्वश्रूत! मात्र, आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप त्यातून झाले. मात्र, तरीही विखेंनी त्यास वार्यावर सोडले नाही. आता या निवडणुकीत त्याने विरोधी भूमिका घेतली आणि विखे किती वाईट हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच विखेंच्या आशीर्वादाने मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून त्या तरुणाने मिळवलेली माया आणि त्याचा झालेला आर्थिक विकास जनता विसरलेली नाही. त्यामुळेच या तरुणाला, ‘विखेंनी खाऊ घातलेले दातातून निघाले का?’, असा प्रश्न आता नगर तालुक्यातील जनता प्रश्न विचारत आहेत.
साखर सम्राटाचं पोरगं अन् मास्तरचं पोरगं यातून सहानभूतीचा फसलेला प्रयोग!
सामान्य कुटुंब आणि प्रस्थापित कुुटुंब असे पहिल्यादिवसापासून निर्माण करण्यात आलेले चित्र शेवटच्या टप्प्यात राहिले नाही. साखर सम्राटाचा पोरगा आणि मास्तरचा पोरगा अशी लढाई असल्याचे दाखवत सहानुभूती मिळविण्याचा केलेला प्रयत्न देखील फसला! अर्थात, त्यासाठी स्वत: लंके हेच कारणीभूत ठरले. मास्तरचं पोरगं असल्याने साखर सम्राट माझ्या विरोधात असल्याचं सांगणार्या लंके यांनी उमेदवारी दाखल करण्याआधी जिल्हाधिकार्यांना उद्देशून वापरलेली ऐकेरी भाषा, पोलिस अधिकार्याचा काढलेला बाप आणि ती भाषा बोलताना एखाद्या नामचिन गुंडाला लाजवेल अशी केलेली देहबोली! सारेच अनाकलनीय आणि अनपेक्षीत असले तरी पारनेरच्या जनतेला हे नवीन नाही. मतदारसंघातील पारनेर वगळता अन्य तालुक्यातील जनतेला मास्तरचं हे पोरगं आताशी कुठं पाळण्यात दिसत असल्याचे आणि त्याला संधी द्यावी असं वाटत असताना त्याने पाळण्यात असताना दाखवलेले त्याचे खरे रुप पाहून सारेच परेशान झाले. खासदार होण्याआधीच जर बाप काढणार असेल तर खरा खासदार झाल्यावर हा कोणालाच नीट राहू देणार नाही याची पुष्टीच यातून मिळाले. त्यामुळेच सहानुभूती मिळविण्याचा तो प्रयोग फसल्याचेच स्पष्ट झाले.
पतसंस्थांची जिरवता-जिरवता ठेवीदारांसह पाच हजार कर्मचार्यांचे कुटुंब रस्त्यावर!
सहकाराची पंढरी अशी नगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली असताना सावकारशाहीला आळा घालण्याचे काम सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून झाले. या चळवळीतून अनेक नेते देखील घडले आणि काही नेता होऊ पाहणारे जेलमध्ये देखील गेले. मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेतील पहिल्याच विजयी भाषणात नीलेश लंके यांनी पतसंस्थावाल्यांकडे पाहून घेण्याची आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची भाषा वापरली. काही अपप्रवृत्ती वगळता चांगले कामकाज चालू असताना लंक व त्यांच्या समर्थकांनी गेल्या दोन वर्षात बहुतांश पतसंस्थांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना रान पटवले. त्यातून अनेक पतसंस्था अडचणीत आल्या. ठेवीदारांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. पतसंस्थांमाध्यमातून तालुक्यात जवळपास पाच हजार कर्मचार्यांचे संसार चालू होते. हे संसार वार्यावर येण्याची वेळ आली. राजकारणात विरोधात भूमिका घेतली म्हणून पतसंस्थां चालकांची जिरवण्यास निघालेल्यांकडून ठेवीदार आणि कर्मचार्यांचीच जिरवली गेली. काहीच कारण नसताना गैरसमजाचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक घटकांना याचे दुष्परीणाम भोगावे लागले.
देवरे यांचा ‘द रुट्स ऑफ ऑडीओबाँब’ पुस्तकाचे अण्णांकडून कौतुक; जिल्ह्यात धमाका!
कोरोना कालावधीत संपूर्ण राज्यात आपल्या कामाचा ठसा उमटविणार्या महिला तहसीलदार म्हणून पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांचा गौरव झाला. देवरे यांनी नीलेश लंके यांना भाऊ मानले होते आणि राखी देखील बांधली होती. मात्र, अवास्तव अपेक्षा आणि मागण्यांची पुर्तता करण्यात नकार मिळताच संतापलेल्या लंके यांच्याकडून आपला कसा छळ होत आहे आपण आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत कसे पोहोचलो आहोत याची ऑडीओ क्लीप तहसीलदार देवरे यांनी तयार केली आणि पुढे ती व्हायरल झाली. त्या क्लीपच्या माध्यमातून नीलेश लंके यांचा भयानक चेहरा समोर आला. यानंतर त्याच देवरे यांच्या विरोधात लंके व समर्थकांनी रान पेटवले. पुढे त्यांची बदली झाली. मात्र, त्याच ज्योती देवरे यांनी ‘द रुट्स ऑफ ऑडिओबाँब’ हे पुस्तक लिहीले. त्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना हे पुस्तक त्यांनी भेट दिले. अण्णांनी देवरे यांच्या या पुस्तकाचे कौतुक करताना त्यांची धाडसी लिखाणाचेही कौतुक केले. हे पुस्तक आणि त्यातील मजकुर याचे मतदारसंघात सामुहिक वाचन होत आहे. ज्योती देवरे यांच्या या पुस्तकाने सध्या मोठा धमाकाच उडवून दिला आहे.
बाजूने लिहिलं की सच्चा अन् विरोधात लिहिलं की विकाऊ!
हवा कोणाची हा प्रश्न गेल्या महिनाभरात चर्चेत राहिला. दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या- त्यांच्या परीने माणसं उभी केली आणि हवा त्यांच्याच उमेदवाराची कशी आहे हे वाजवू- वाजवू सांगितले. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या माध्यमातून प्रत्येकाने त्याच्या कुवतीनुसार भूमिका मांडल्या. मात्र, बाजूने भूमिका मांडली, बाजूचे उदोउदो करणारा सच्चा पत्रकार आणि विरोधात भूमिका मांडत समोरच्या उमेदवाराचे गुणगाण गायले की तो पत्रकार पाकीटवाला, विकाऊ म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली. त्यातून सर्वच पत्रकारांना बाजारात बसवण्याचा झालेला प्रकार निंदणीयच! विरोधी भूमिकाच मांडायची नाही अशी प्रवृत्ती सध्या जन्माला आली. समाजमाध्यमातून विरोधी मत व्यक्त करणारा लागलीच विरोधकांचा लाभार्थी म्हणून संबोधण्याचा नवा फंडा या निवडणुकीत जन्माला आला.
कलेक्टर, पोलिसाचा बाप काढणार्याबद्दल धनंजय मुंडे ‘जरा स्पष्टच’ बोलले!
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार असताना नीलेश लंके यांना चौकटीच्या बाहेर जात अनेकदा मदत केली. त्याला वेगळी कारणे आहेत. मात्र, त्याच धनंजय मुंडे यांनी काल राहुरीच्या सभेत मुद्यावरच बोट ठेवले. ‘तुम्ही ज्याला सामान्य म्हणता, तो पावला पावलावर रुप बदलणारा बहुरुपी आहे! पोत्यावर बसून दाढी केल्याची नौटंकी करणारा आहे. मंदिरात झोपून त्याने अनेकदा रुप बदललं असल्याचं सागतानाच सुसंस्कृत आणि उच्च शिक्षीत समजल्या जाणार्या पारनेर तालुक्याचं वाटोळं करण्याचं पाप त्याच्या माथी असल्याचं त्यांनी ठणाकावून सांगितलं. पोलिसांचा बाप काढणारा सामान्यांचे काय हाल करणार हे सांगण्यास देखील धनंजय मुंडे विसरले नाहीत. लंके यांना ताकद देणार्या धनंजय मुंडे यांनीच असं विधान केले असल्याने त्याचे अनेक संदर्भ सध्या नगरकर काढत आहेत.