नेवासे / नगर सहयाद्री : नेवासे येथील ग्रामदैवत मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कुस्त्यांचा हगामा आयोजित केला होता. यामध्ये एक नंबरच्या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी सुदर्शन कोतकर याने सेनादलाचा संग्राम पाटील याला चितपट करत ज्ञानमोहिनी केसरी किताब पटकावला. कोतकर यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली. या हगाम्यात कोतकर यांना मानाची गदा प्रदान करण्यात आली.
दोन नंबरच्या कुस्तीमध्ये संभाजीराजे कुस्ती केंद्र नगरचा पैलवान युवराज चव्हाण याने सेनादलाच्या अनिरुद्ध पाटील याला चितपट केले. तीन नंबरच्या कुस्तीसाठी त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान योगेश चंदेल याने भारत अर्जुन वागडेला चितपट केले.
चार नंबरच्या कुस्तीसाठी हनुमान आखाडा उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान सागर कोल्हे याने शिवराम दादा कुस्ती केंद्र पुणेचा पैलवान सुनील नवलेला चिटपट केले. पाच नंबरच्या कुस्तीसाठी त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान युवराज खोपडे याने ऋतिक इगवे याला चितपट केले. सहा नंबरच्या कुस्तीमध्ये गोकूळ वस्ताद तालमीचा पैलवान अक्षय कावरे याने भारत माता व्यायाम शाळा हसूलचा पैलवान राहुल पाडळे याला चितपट केले.
सात नंबरच्या कुस्तीमध्ये शिवछत्रपती कुस्ती संकुल करमाळाचा पैलवान अमोल नरोटे याने त्रिमूर्ती कुस्ती केंद्राच्या पैलवान रोहित आजबे याला चीतपट केले. आठ नंबरच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचा पैलवान शुभम जाधवने शिवछत्रपती कुस्ती संकुल करमाळा येथील पैलवान लतेश टकले याला चितपट केले. नऊ नंबरची कुस्ती श्रीराम कुस्ती केंद्र बुहानगर पैलवान सौरभ मराठे व संभाजीराजे कुस्ती संकुलाचा पैलवान लक्ष्मण धनगर यांच्यात झाली. ही कुस्ती बराच वेळ चालल्यामुळे बरोबरीत सोडावी लागली.
याचबरोबर इतर शंभरहून अधिक जास्त कुस्त्या मैदानामध्ये जोडल्या होत्या. पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. संभाजी निकाळजे, प्रा. सुरेश लव्हाटे, पैलवान संदीप कर्डिले यांनी काम पाहिले. विजेता सुदर्शन कोतकर यास मानाची गदा व ज्ञानमोहिनी किताब देऊन सन्मानित करण्यात आले. विजेता कोतकर यांचे नगरसेवक संग्राम शेळके, युवा शहरप्रमुख ठाकरे गट हर्षवर्धन कोतकर आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.