अहमदनगर | नगर सह्याद्री
श्री जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट बुर्हाणनगरच्या (ता. नगर) विश्वस्तपदी अमृता सागर भगत व सुशील नानाभाऊ तापकिरे यांची नियुक्ती धर्मदाय उपायुक्त यांनी केली. ४४ वर्षापासून सुरु असलेल्या अविरत न्यायालयीन लढ्याला यश आले आहे.
न्यासाची स्थापना कै. किसन लहानू भगत यांनी १९५२ साली केली होती. तेव्हापासून खाजगी मालमत्ता म्हणून त्याचा वापर चालू होता. परंतु १९८० सालापासून बुर्हाणनगर ग्रामस्थांनी सेशन कोर्ट, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, धर्मदाय उपायुक्त, धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न्यायालयीन लढा चालू केला होता. अखेर त्या लढ्यास यश येऊन १० एप्रिल रोजी देवस्थानवर दोन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
२९ नोव्हेंबर २००८ धर्मदाय सहआयुक्त पुणे यांनी न्यास लागू केलेली योजना जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी कायम केली. त्यानुसार बुर्हाणनगर सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी धर्मदाय उपायुक्त अहमदनगर यांच्याकडे मंजूर योजनेनुसार दोन विश्वस्त यांची नेमणूक करण्याचा अर्ज दाखल केला. सदरील अर्जाची गुणदोषांवर चौकशी होऊन धर्म आयुक्त पुणे यांनी निर्धारित केलेल्या योजनेनुसार उपधर्मदाय आयुक्त यांनी वर्तमानपत्र मध्ये जाहिरात देऊन इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागून मुलाखती घेतल्या.
१० एप्रिल रोजी अमृता भगत व सुशील तापकिरे यांची सदर ट्रस्टच्या विश्वस्तपदी नेमणूक केलेली आहे. सरपंच रावसाहेब कर्डिले न्यासाचे सचिव म्हणून कामकाज पाहतील व अध्यक्ष म्हणून भगत कुटुंबातील व्यक्ती काम पाहणार आहे. न्यायालयीन कामकाजासाठी माजी न्यायाधीश म्हसे, अॅड. नरेश गुगळे, अॅड. भाऊसाहेब काकडे, अॅड. धोर्डे, अॅड. नितीन गवारे, अॅड. ओस्वाल, अॅड. ठोंबरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अॅड. सागर गुंजाळ यांनी ट्रस्टसाठी मोलाचे सहकार्य केले. बुर्हाणनगर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व देवी भक्त यांनी सलग ४४ वर्षापासून अवरित न्यायालयीन लढा देऊन दिलेल्या योगदानाला यश आले आहे. या विश्वस्त पदाच्या झालेल्या नियुक्तीबद्दल ग्रामस्थांनी नवनिर्वाचित विश्वस्तांचे अभिनंदन केले.