अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांच्या घटना घडत होत्या, अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अखेर या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले. त्यामुळे महामार्गाच्या पॅचिंग कामाला प्रारंभ झाला आहे.
या पॅचिंग कामाची सुरुवात होताच आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, तसेच अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर अक्षरशः मोठमोठे खड्डे पडले आहेत. चालकांना खड्डे चुकवताना अपघातांचा धोका निर्माण होत आहे. अनेक नागरिकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे पॅचिंग सुरू करण्याची गरज होती.
त्यांनी पुढे सांगितले की, पावसाळ्याच्या काळात काम करणे कठीण होते. मात्र आता पाऊस ओसरला असून, जलद गतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर शहर ते नेवासा फाटा पर्यंतचा रस्ता पूर्ण केला जाईल, त्यानंतर उर्वरित भागाचं कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
या महामार्गाची अवस्था इतकी दयनीय झाली होती की, काही ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती.
वाहन चालकांना प्रवास करताना खड्डे चुकवणे हेच आव्हान बनले होते. या समस्येवर उपाय म्हणून आमदार जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून काम सुरू करण्याचे आदेश दिले.महामार्गावरील पॅचिंग कामामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रवास सुलभ व सुरक्षित होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.