पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे आहे. जामगांव येथे पानमळा परिसरात धुळीचे साम्राज्य पसरल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पिकांवर धुळीचा थर साचून पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.
याबाबत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. तालुक्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी सदर ठिकाणी भेट देऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन सदर रस्त्याच्या ठेकेदारास संपर्क करून निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे व सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी मा. सरपंच दिनकर सोबले, मनोज शिंदे, संतोष चौधरी, उत्तम चौधरी, बबन चौधरी, सागर चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता. लवकर तोडगा निघाल्याने उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
जामगांव ते पारनेर या चालू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत सदर ठेकेदारस जाब विचारला असता ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत होता. यापुढे जर सदर रस्त्याच्या कामात सुधारणा न दिसल्यास काम बंद पाडण्यात येईल असा इशारा सरपंच दिनकर सोबले यांनी दिला.