मुंबई। नगर सहयाद्री
मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार अशी चर्चा होती. आता मात्र बळीराजासाठी खूशखबर मिळाली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील ३ दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा पाऊसाने गुरुवारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात पावसाने तुफान बॅटिंग केली.
तसेच येत्या ३ दिवसांत मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडक देईल. त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मुंबई, पुणे, ठाणे, पालघर नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.