आहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चक्क कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची चर्चा आहे. कुत्रा अंगावर धावून आल्याने अपघात झाल्याचा दावा करत पोलिसांना ‘रॉटविलर’ जातीच्या कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये प्रथमच एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय घडलं?
संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील एक महिला 15 जानेवारी रोजी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील एका बंगल्याच्या गेट मधून अचानक एक रॉटविलर जातीचा पाळीव कुत्रा महिलेच्या दिशेने जोरात धावत आला. त्यामुळे घाबरेल्या महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्या स्कूटीसह कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या. अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी गुन्हा दाखल करत भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
श्वानाची ही चुकी मालकांसाठी डोकेदुखी
तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे, त्याला फिरायला नेताय तर सावधान. तुमच्या श्वानाची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. बऱ्याचवेळा धावत्या बाईक मागे किंवा कारमागे कुत्रे धावत सुटत असतात, अशावेळी बाईक चालक भीतीमुळे वाहनाचा स्पीड वाढवतात. त्यामुळे अपघात घडतात. श्वानाची ही चुकी मालकांसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.