पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांच्या माणसांवरील आणि लहान मुलांवरील जीवघेण्या हल्ल्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या आठवड्यात कळस येथे एका व्यक्तीचा आणि पारनेर येथे एका बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि भय आहे. या घटनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षणही खंडित होत आहे, कारण पालक मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत.
ग्रामस्थांनी वन खात्याच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वन खाते केवळ कागदी कारवाई आणि बिले काढण्यात व्यस्त असल्याचा आरोप आहे. पकडलेले बिबटे आणे घाट परिसरात सोडल्याने तालुयातील बिबट्यांची संख्या वाढत आहे, असा दावा नागरिकांनी केला आहे. यामुळे बिबट्यांचा धोका आणखी गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर, पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांनी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, जर वन खाते आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलणार नसेल, तर आम्हाला शस्त्र परवाने द्या. त्यांच्या या मागणीने प्रशासनावर दबाव वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.