पारनेर। नगर सहयाद्री:-
खराब रस्त्यांवर टोल आकारणी नको या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावरील सुपा टोल नाका आणि नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर येथील ढोकी टोल नाक्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. रिपब्लिकन पाट ऑफ इंडियाचे पारनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी ही मागणी तीव्रतेने मांडली आहे. खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचा मृत्यू हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
उबाळे यांच्या मते, या महामार्गांवरील रस्त्यांची दुरवस्था गंभीर आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात येत असून, नगर कल्याण महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, रस्त्यांची देखभाल योग्य नसेल तर टोल आकारणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे या टोल नाक्यांवर तातडीने कारवाई करून टोल वसुली थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तालुकाध्यक्ष उबाळे यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, जर रस्त्यांची दुरुस्ती आणि टोलमुक्तीची मागणी पूर्ण झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.