पारनेर। नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गोरगरिबांना आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने हे केंद्र सुरू करण्यात आले असून दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही ही वैद्यकीय अधिकारांसह इतर कर्मचारी कायमच गैरहजर असतात त्यामुळे रुग्णांना उपचाराअभावी हेळसांड होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी व गरीब गरजू रुग्णांना वेठीस जाणार्या वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी खडकवाडीचे सरपंच शोभा अण्णासाहेब शिंदे व उपसरपंच अक्षय बाबाजी ढोकळे यांनी केली आहे.
खडकवाडी परिसरात मोठया प्रमाणावर अदिवासी समाज वास्तव्य करीत असून,त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्याची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे,परंतु दोन वैद्यकीय अधिकार्यांसह इतर स्टाफ पण मोठ्या प्रमाणावर असून देखील गरजूंना उपचार वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. गरजू रुग्णांना या ठिकाणी उपचार मिळत नसल्याची व्हिडिओ चित्रीकरण उपसरपंच अक्षय ढोकळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे सादर केले आहे.
आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले असून त्यांनी २४ तास मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. परंतु असे असतानाही नियमांचे उल्लंघन करून हे अधिकारी त्यांचे सवडीनुसार आरोग्य केंद्र मध्ये उपस्थित असतात. त्यामुळे परिसरातील १० ते १२ गावातील अनेक गरजू रुग्ण सकाळीच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराच्या आशेने येत असतात परंतु वैद्यकीय अधिकारीव कर्मचारी उपस्थित नसतात त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकार्यावर कारवाई करावी अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा उपसरपंच ढोकळे यांनी दिला.
उपसरपंच ढोकळेंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टिंग ऑपरेशन
खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत असल्याने व अपघात ग्रस्त लोकांना मदत मिळाली नसल्याने तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उपसरपंच अक्षय ढोकळे यांनी अगोदर तक्रार दाखल करत संबंधीचे व्हिडिओ त्यांनी पाठविले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारांसह इतर कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच अक्षय ढोकळे यांच्यासह खडकवाडी ग्रामस्थांनी केली आहे.