मुंबई / नगर सह्याद्री
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलन करण्यात आले.
विशेष म्हणजे हा पुतळा उभारून फक्त 8 महिने झाले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
या घटनेवरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगले तापले असून, अशात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतंच ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडी या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे, तसंच येत्या रविवारी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेन, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
वाऱ्याने पुतळा पडला हे कारण निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल. आम्ही असं ठरवलं दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून.
गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपवाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे.
काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. याचा अर्थ याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का?” अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.