मुंबई | नगर सहयाद्री
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर सरकारकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी 11 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. जाहीरनाम्यात महायुतीने अनेक आश्वासनं दिली असल्याने अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी पूर्तता होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होते.
केंद्र सरकारने आधीच आयकरात कपात करत मध्यमवगयांना दिलासा दिला आहे. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र व्हावे असा नरेंद्र मोदीचा संकल्प आहे. महाराष्ट्र हा संकल्प पूर्ण करताना थांबणार नाही. विकासचक्राला गती देणं आवश्य आहे यासाठी सर्वसमावेशक विकास केला जाणार आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही. महाराष्ट्रात थेट परदेश गुंतवणुकीतही अव्वल आहे. 56 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्या माध्यमातून 16 लाख रोजगार निर्मिती होईल. राज्याचं नवं औद्योगिक धोरण लवकर जाहीर केलं जाणार आहे. त्यातून 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचं उद्धिष्ट असेल असं अजित पवारांनी सांगितले आहे.
“संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार”,
छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने त्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. अशातच राज्यातील महायुती सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. यासह हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या युद्धाचं स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जाहीर केलं. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे शिवाजी महाराजांचं स्मार्क उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी आज केली.
अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा मी करतो.”
छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु-बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.”
पानिपत येथे स्मारक उभारणार
अजित पवार म्हणाले, “स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.”
आग्र्यात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
आंबेगावात शिवसृष्टी प्रकल्प उभारणार
अजित पवार म्हणाले, “येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.”
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी
नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10 हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार
महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या धोरणाच्या ५ वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट असेल. नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स ॲन्ड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत.
येतंय ५ वर्षात वीजदर कमी होणार
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी,” महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे” अशी माहिती दिली. तसेच ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज असल्याचे त्यांनी म्हटले . तसेच यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला
राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास, सुलभ जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयातील सोयीसुविधा, गुंतवणुकीचा प्रसार, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम, पारदर्शक, गतिशील, लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल, याची खात्री आम्हाला आहे.
मुंबईसाठी काय काय?
मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे.
पायाभूत सुविधा विकासांसदर्भात घोषणा
पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात 2.5 ते 3.5 रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे अजित पवार म्हणाले.
सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास 3 हजार 159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागास 2 हजार 899 कोटी रुपये, मराठी भाषा विभागास 225 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये
सन 2025-26 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक बांधकाम- इमारती विभागास 1 हजार 367 कोटी रुपये, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागास 3 हजार 159 कोटी रुपये, सामान्य प्रशासन विभागास 2 हजार 899 कोटी रुपये, मराठी भाषा विभागास 225 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
कुंभमेळ्यासाठी काय?
सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने “नमामि गोदावरी” अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येत आहेत.