Favorite Photographer Scheme: शासनाची निवडणूक पूर्व लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत आहे. तेव्हापासून अनेक संघटना सरकारने आमच्यासाठी देखील योजना सुरू करावी अशी मागणी करत आहे.आता फोटोग्राफर संघटने कडून देखील शासनाकडे “लाडका फोटोग्राफर ” ही योजना राज्य सरकारने चालू करून फोटोग्राफी क्षेत्रातील जुन्या ज्येष्ठ कलावंतांना या माध्यमातून मदत करावी अशी मागणी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी कर्जत येथे बोलताना केली आहे.
कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कर्जत तालुक्यातील सर्व फोटोग्राफर यांचा स्नेह मेळावा रेहकुर येथे आयोजित केला होता. कॅमेरा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष सचिन गायकवाड,योगेश लांडगे, राजेंद्र खैरे,कैलास पंडित यांच्यासह अनेक जण व कर्जत तालुक्यातील सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सचिन गायकवाड म्हणाले की,छायाचित्रकार व्यावसायिकाचं कुटुंब, मुलांचं शिक्षण, फायनान्स च कर्ज आणि मोबाईल वापर या मुळे फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये झालेली कमतरता लक्षात घेता, तसेच वाढती महागाई व इतर अनेक समस्यांमुळे राज्य शासनाने याची नोंद घेऊन जसं की लाडकी बहीण योजना अमलात आणली तसेच फोटोग्राफर साठी लाडका फोटोग्राफर ही योजना शासनाने राबवावी, अशी मागणी केली आहे.
महागाईच्या संकटामध्ये वाढलेल्या कॅमेऱ्याच्या किमती , शाई च्या वाढलेली किमत, पेपर ची किंमत वाढ,इत्यादी बाबी लक्षात घेता आज कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवाढ संदर्भामध्ये चर्चा करून साखरपुडा, लग्न, समारंभ, वाढदिवस आणि विविध सामाजिक फोटोग्राफीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यानुसार नवीन दर पत्रक सर्व छायाचित्रकारांना वाटप करण्यात आली.यावेळी सचिन पोटे, नितीन कोल्हे,आकाश बिडगर,अजित अनारसे,राजेंद्र खैरे, योगेश लांडगे, कैलास पंडित आदी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केली.
तसेच कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली , तालुकाध्यक्षपदी उमेश जपे , उपाध्यक्ष भरत तुपे, सचिव आकाश बिडकर , कार्याध्यक्ष महेश जाधव , खजिनदार तुकाराम सायकर यांची तर संचालक पदी व बबन कोरे,महिंद्र उघडे,अजित अनारसे,नितीन काळे, सुनील शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अद्यावत प्रणाली,सोशल मीडियाचा वापर, वाढती महागाई व व्यावसायिक नियोजन कस असावा या संदर्भात सागर डाळिंबे यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड व आभार शिरीष यादव यांनी व्यक्त केले.