अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी एकाविरोधात महानगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्तमश जरीवाला (रा. अहिल्यनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर “विशेष सूचना- अहिल्यानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की, पाणी गरम करून प्यावे. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघाड झाल्याने येत्या ३ किंवा ४ दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी आणि आपण पण काळजी घ्यावी.”, अशा आशयाचे पत्रक असलेला मेसेज आला. अशा खोट्या बातम्या पसरवून महानगरपालिकेची बदनामी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.