अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
विवाहितेचा छळ करणार्या पतीसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपोवन रस्ता परिसरात राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पती राहुल सुरेश पवार, सासरे सुरेश जालिंदर पवार, सासु शालिनी सुरेश पवार (सर्व रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी), ननंद आरती रवी रावत (रा. कल्याण रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहनंतर फिर्यादी सासरी नोव्हेंबर 2009 ते 30 जून 2024 दरम्यान नांदत असताना त्यांना मुलबाळ होत नसल्याने सासरच्यांनी त्रास दिला. त्यानंतर त्यांना मुलगी झाली म्हणूनही त्यांचा सासरच्यांनी छळ केला.
गाडी घेण्याकरीता माहेरून पैसे घेऊन ये असे म्हणून त्यांचा छळ करण्यात आला. अपमानास्पद व क्रुरतेची वागणुक देवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. सासरच्या लोकांच्या त्रासाळा कंटाळून पीडिताने येथील भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समेट न झाल्याने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भरोसा सेलने पत्र दिले. त्यानंतर फिर्यादीने बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.