मुंबई / नगर सह्याद्री –
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जुलै महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दहापेक्षा जास्त भेटीगाठी आत्तापर्यंत झाल्या आहेत. तसंच हे दोघंही युती करुन महापालिका निवडणुका लढतील हे जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सत्याचा मोर्चामध्येही एकत्र दिसले होते. मात्र राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण राज ठाकरेंना मविआमध्ये घेणं हे काँग्रेसला पसंत नाही. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तसे संकेत दिले आहेत.
मुंबईच्या संदर्भात अजून केंद्रीय स्तरावरचा निर्णय होणं बाकी आहे. केंद्रीय नेतृत्वाची जी एकंदर निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाते. आम्ही आमच्या भावना नेतृ्त्वाला कळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट पाहू तो लवकरच जाहीर होईल. राहता राहिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जी बैठक पार पडली त्यातही मनसेबाबत चर्चा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाची रणनीती कशी असावी? हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे. राहता राहिला प्रश्न मनसेचा तर त्या पक्षाच्या स्थापनेपासूनच त्यांचे आणि आमचे मतभेद आहेत. वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत हे जाहीर आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. काँग्रेस पक्षाची भूमिका, विचार हे कितीही वादळं आली तरीही मूलभूतरित्या कायम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचं पालन करत असतो. इतर पक्षांचं मला माहीत नाही. पण काँग्रेस विचारांवर चालणारा पक्ष आहे. असं सचिन सावंत यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
मतचोरी हा मुद्दा वेगळा आहे आणि एकत्र लढणं हा मुद्दा वेगळा आहे. दुबार मतदार आहेत हे भाजपाने मान्य केलं आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना काँग्रेसला आम्ही कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. काँग्रेसनेही कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. सध्या आम्ही मतचोरीच्या विरोधात लढत आहोत. असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जुलै २०२५ पासून एकत्र
दरम्यान राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसह लढत असल्याने मनसे आणि शिवसैनिक यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. पण काँग्रेसला मात्र राज ठाकरेंना मविआत घेण्यात अडचणी आहेत हे दिसून येतं आहे. सचिन सावंत यांनी थेटपणे नाही तरी संकेत देत हेच सांगितलं आहे की राज ठाकरेंबाबतच्या भावना आम्ही हायकमांडकडे पोहचवल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासूनच आमचे मतभेद आहेत हे देखील सचिन सावंत म्हणाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने जर वेगळं लढण्याचा निर्णय घेतला तर राज ठाकरेंच्या येण्याने महाविकास आघाडीत फूट पडली का? हा प्रश्न चर्चिला जाईल यात शंकाच नाही.
२०१९ ला महाविकास आघाडीची स्थापना
२०१९ ला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह आघाडी करत महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे चालवलं. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष तेव्हा विरोधात होता. तसंच राज ठाकरेही या सरकारच्या विरोधात होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज ठाकरे हे महायुतीसह होते. मात्र आता महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे हे दोघंही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जाहीरपणे फिरतानाही दिसत आहेत. तरीही काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांना राज ठाकरेंना बरोबर घेणं ही बाब रुचलेली नाही. भाई जगताप यांनीही राज ठाकरेंच्या नावाला हरकत घेतल्याचं आधी समोर आलं होतं. आता हायकमांडने जर निर्णय घेतला तर काँग्रेसला हे धोरण मान्य करावंच लागेल. पण तूर्तास तरी राज ठाकरेंमुळे मविआत ऑल इज नॉट वेल आहे असंच चित्र दिसतं आहे.



