कर्जत | नगर सह्याद्री
जामखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेती पाण्याखाली गेली, घरांमध्ये पाणी शिरले, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरे पडून गावकऱ्यांना विस्थापित व्हावे लागले. रस्ते आणि बंधारे वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब स्वतः ट्रॅक्टर चालवून पुरग्रस्त भागांमध्ये गेले. पाण्याखाली गेलेल्या आणि वाहनांद्वारे पोहोचता न येणाऱ्या गावांमध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष दौरा करत शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
गावकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेताना प्रा. शिंदे यांनी सांगितले की, अशा प्रकारचा पाऊस याआधी कधी झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या संकटाकडे गांभीर्याने पाहून प्रत्येक बाधित शेतकरी व नागरिकाला मदत मिळेल, याची मी वैयक्तिक पातळीवर काळजी घेईन.
यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला काटेकोरपणे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकरी व नागरिकांचे नुकसान प्रामाणिकपणे नोंदवून तातडीने अहवाल शासनाकडे पाठवावा आणि बाधितांना मदतीपासून वंचित राहू देऊ नये, असे आदेश त्यांनी दिले. सभापतींच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, शासनस्तरावर मदत व पुनर्वसनासाठी तातडीचे निर्णय होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.