अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जागेच्या वादातून व्यावसायिक अमोल रतनसिंग ठाकूर (वय 48 रा. चिपाडे मळा, केडगाव येथील ) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीरपणे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी विशाल गौतम ठाकूर, कुणाल गौतम ठाकूर, आणि गौतम रमेश ठाकूर (सर्व रा. जुना बाजार, नगर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास नांगरे गल्लीत सदरचा प्रकार घडला.
फिर्यादी अमोल ठाकूर यांची नांगरे गल्लीत चहाची टपरी आहे. त्यांचे संशयित आरोपींसोबत जागेवरून वाद आहेत. या कारणातून शनिवारी दुपारी संशयित आरोपी यांनी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर येत शिवीगाळ करून धारदार शस्त्राने वार केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. जखमी फिर्यादीवर उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन गायकवाड करत आहेत.