शिर्डीतील ‘ग्रो मोअर’पेक्षा ५० पट घोटाळा | पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचार्यांची सर्वाधिक गुंतवणूक
सारीपाट / शिवाजी शिर्के
‘ग्रो मोअर’चे दीड कोटी लुटणार्या पोलिसांच्या टोळीला हिसका दाखविण्याचे काम पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. कायद्याचे रक्षक असणार्यांनीच लुटण्याचे काम केल्याने खाकीची बेअब्रू झाली. ‘ग्रो मोअर’मध्ये शिर्डी, राहाता परिसरातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असताना इकडे नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सिस्पे या कंपनीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. यातील किमान पाचशे कोटी रुपये नगर जिल्हा पोलिस दलातील सातशेपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांचे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांचेच पैसे गुंतले असल्याने सामान्य ठेवीदार तक्रार द्यायला आला तरी त्याची दखल न घेता सिस्पेच्या टोळीला संरक्षण दिले जात आहे. ठेवीदार हवालदिल झाले असताना पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचार्यांनी संगणमत करत या टोळीला अभय दिले असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.
हप्तेखोरीतील पोलिसांचा चोरीचा मामला!
जिल्हा पोलिस दलातील जवळपास सातशे पोलिस कर्मचारी आणि शंभरपेक्षा अधिक अधिकार्यांनी सिस्पे अन् याच कंपनीच्या संचालकांनी स्थापन केलेेल्या अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. जास्तीचे परतावे त्यांना मिळत गेले आणि त्यातून गुंतवणूक करणार्या पोलिसांसह त्यांच्या अधिकार्यांची संख्या देेखील वाढत गेली. वास्तविक गुंतवणूक करण्यात आलेल्या पैशांपैकी काहीचे पैसे हे हप्तेखोरीतील! मात्र, काहींनी सोने गहाण ठेवले आणि पैसे गुंतवले. कंपनीनेच गाशा गुंडाळल्याने आता या सार्यांनाच हात चोळत बसण्याची वेळ आली आहे.
नवनाथ औताडे अनेक पोलिसांच्या संपर्कात!
सिस्पेसह अन्य कंपन्यांच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारा मास्टरमाईंड नवनाथ औताडे दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे. त्याची पत्नी यात आरोपी आहे. औताडे दुबईत आहे की नगरमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा झडत असताना याच औताडेच्या संपर्कात ज्यांनी यात गुंतवणूक केली असे अनेक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी आजही आहेत.
तत्कालीन डीवायएसपी भोसलेंची चौकशी होणार का?
सुपा (पारनेर) येथे सिस्पेच्या संचालकांनी वेगळ्या नावाने कंपनी कार्यालय सुरू केले. या कार्यालयाच्या उद्धघाटनासाठी नगर ग्रामीणचे तत्कालीन उपअधीक्षक संपत भोसले यांना निमंत्रीत केले गेले. भोसले हे खाकी वर्दी घालून व्यासपीठावर गेले आणि या कंपनीत गुंतवणूक किती आणि कशी सुरक्षीत आहे याचे लांबलचक भाषण त्यांनी दिले. त्यावेळी व्यासपीठावर खासदार निलेश लंके हे देखील होते. त्यांनीही या कंपनीचे संचालक आणि त्यांचे सहकारी किती चांगले आहेत आणि येथील गुंतवणूक किती सुरक्षीत आहे याबाबत सांगितले. त्या गुणगान कार्यक्रमानंतर अनेकांनी या कंपनीत जास्तीच्या परताव्यापोटी गुंतवणूक केली. आता या कंपनीने जवळपास गाशा गुंडळल्यात जमा असताना गुंतवणुकदारांची रक्कम कशी मिळणार याचे उत्तर ना भोसले देऊ शकत, ना खासदार लंके!
आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीत लूटमारच!
ग्रो मोअर कंपनीतील गुंतवणुकदारांना पैसे मिळेनासे झाल्यावर त्यातील काहींनी पोलिसात तक्रार केली. तक्रारीची चौकशी करताना ग्रो मोअरच्या संचालकांना पकडून त्यांच्याकडून दीड कोटी रुपये उकळण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर पीएसआय आणि चार कर्मचारी निलंबीत केले गेले. वास्तविक, ग्रो मोअरच्या संचालकांना धाडस दाखवले म्हणून हे समोर आले. अशा प्रकारे अन्य आर्थिक प्रकरणात याआधीही मोठ्या प्रमाणात लुटमार झाली असताना अनेकांनी त्यावर भाष्य केले नाही आणि मांडवली केली गेली.
एलसीबीच्या किरणकुमार कबाडी
यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर!
पोलिस अधीक्षक म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर सोमनाथ घार्गे यांनी काही पोलिस ठाण्यांचे कारभारी बदलले. गुन्हे शाखेच्याबाबत निर्णय घेण्यास त्यांनी वेळ घेतला. दिनेश आहेर व त्यांच्या काही सहकार्यांनी दमदार कामगिरी केली आणि अनेक अवघड गुन्ह्यांची उकल करताना आरोपींना बेड्या देखील ठोकल्या. मात्र, ग्रो- मोअरच्या दीड कोटी खंडणीप्रकरणात गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक आणि चार कर्मचार्यांचा सहभाग स्पष्टपणे समोर आल्याने दिनेश आहेर यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आहेर यांची बदली करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या प्रमुख पदाचा कारभार किरणकुमार कबाडी यांच्याकडे देण्यात आला आहे. कबाडी हे अनुभवी असले तरी त्यांची जिल्ह्यातील पहिलीच पोस्टींग आहे.