Today News: दहीहंडी उत्सवाच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडल्याची घटना घडली आहे. डीजे वाजवण्यासाठी साऊंडची टेस्टिंग करणाऱ्या दोन तरुणांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना वर्धा जिल्ह्यातील सालोड हिरापूर येथे घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तरुणांची नावे सूरज चिंदूजी बावणे (27) व सेजल किशोर बावणे (13) आहेत. दोघेही डीजे वाजवण्यासाठी विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्य वाहिनीवरून वीज घेण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना शॉक लागला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रात्रभर त्या तरुणांचे मृतदेह तारेला चिकटलेले होते, आणि रात्र असल्यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. आज सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह सापडले आणि विजेच्या धक्क्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झाले. याप्रकणी सावंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूरजच्या कुटुंबीयांना दहीहंडीच्या कार्यक्रमात डीजे वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी सुरू केली होती, परंतु विजेच्या धक्क्याने हा अपघात घडला असल्याचे समोर आले असून या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.